ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - जगातील सर्वात लठ्ठ महिला म्हणून ओळखल्या जाणा-या इमानने फक्त पाच आठवड्यात तब्बल 140 किलो वजन घटवलं आहे. इमान अहमदचे वजन 500 किलोहून 358 किलोवर पोहोचलं आहे. चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात दाखल झालेल्या इजिप्तच्या ३६ वर्षीय इमान अहमदचे जेव्हा भारतात आगमन झाले तेव्हा तिचं वजन 500 किलो होतं. तिच्यावर सर्जरी करण्याआधी तिचं वजन कमी करणं गरजेचं असल्याने त्यासाठी तिचं वजन घटवणं गरजेचं होतं. डॉ. मुफ्फजल लकडावाला यांच्या देखरेखेखाली तिची काळजी घेतली जात आहे.
आणखी काही दिवसांनंतर इमानचे पहिल्या टप्प्यातील उपचार पूर्ण झाल्यानंतर इमान इजिप्तला रवाना होणार आहे. इजिप्तला गेल्यानंतरही तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणार असल्याची माहिती डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी दिली.
जगातील सर्वांत वजनदार महिला अशी ओळख असलेल्या इजिप्तच्या इमान अहमदवर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. सैफी रुग्णालयात ७ मार्च रोजी इमानवर वजन कमी करण्यासाठी बेरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेपूर्वी आहार आणि औषधोपचारामुळे अवघ्या महिनाभरातच तिचे १२० किलो वजन घटले होते. त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
सध्या दिवसातून दोन-दोन तासांनी इमान खाते. त्यात हायप्रोटिन्स लिक्विड्सचा आहार सुरू आहे, यात १७५० कॅलरीज् असून २०० ग्रॅम्स प्रोटिन्स आहेत. इजिप्तला घरी गेल्यानंतर इमानला केवळ चिकन सँडविच आणि कस्टर्ड खाण्याची परवानगी आहे.
इमानच्या पहिल्या शस्त्रक्रियेसाठी तिचे वजन कमी करण्याची आवश्यकता होती. त्यानुसार रुग्णालयात दाखल झाल्यापासून इमानचे शस्त्रक्रियेविना १२० किलो वजन घटले होते. इमान गेली कित्येक केवळ ३ ते ४ तास झोपायची, मात्र मुंबईत दाखल झाल्यावर सातत्याने उपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर ती आठ तास झोपते. इमानला सकाळी ७.३० वाजता उठविले जाते, त्यानंतर दर दोन तासांनी तिला द्रवरूपात आहार दिला जातो. शिवाय, केवळ प्रोटिन्स आणि हायफायबर दिले जात आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दर दिवशी केवळ १२०० कॅलरीजचे तिला पथ्य पाळावे लागते. डॉ. लकडावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता इमान स्वत: बसू लागली आहे. येत्या काही काळात ती स्वत:च्या पायांवर उभी राहू शकेल अशी आशा आहे.
इमानसाठी सैफी रुग्णालयात सुमारे २ कोटी रुपये खर्च करून तिच्यासाठी वेगळा कक्ष उभारण्यात आला आहे. इमानसाठी उभारण्यात आलेल्या ‘वन बेड हॉस्पिटल’मध्ये एक ऑपरेशन थिएटर, एक अतिदक्षता विभाग, डॉक्टरांसाठी खोली, दोन विश्रांतीगृहे आणि तळमजल्यावर एक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग रूम आहे. यामध्ये ७ फूट रुंद दरवाजे बांधण्यात आले आहेत तसेच तिच्यासाठी केलेला बेड ७ फूट रुंद आहे. डॉ. मुजफ्फल लकडावाला हे इमानवर शस्त्रक्रिया करत आहेत. ट्विटरवर भारताच्या पररारष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना तिची मदत करण्याची विनंती केली होती. या विनंतीला मान देत स्वराज यांनी भारतात येण्यासाठी वैद्यकीय व्हिसा देऊ केला होता.