- स्वाती पाटील, याचिकाकर्त्यासर्वोच्च न्यायालयाने थरांसाठी २० फुटांची मर्यादा घालून दिली आहे. शिवाय, १८ वर्षांखील गोविंदांना उत्सवात सहभागी होण्यासाठी निर्बंध घातले आहेत. २०१४ साली दहीहंडी उत्सवाविषयी जनहित याचिका दाखल केली. या संघर्षाला दोन वर्षांनंतर काहीसे यश आले आहे. गोविंदांची काळजी वाटण्यामागे कारण आहे. देशाची लोकसंख्या जरी १२३ कोटी असली, तरी या देशाच्या तरुणाचा एक जीवदेखील अनमोल आहे. तो मला जेवढा अनमोल वाटतो, त्याच्या कित्येक पटीने तुमच्या आई-वडिलांना तो अनमोल आहे. तुमच्या जिवापेक्षा त्यांना अधिक काही नाही. ज्यांच्या सगळ््या आशा-अपेक्षा तुमच्यावर आहेत, ते आई-वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचा हात धरून आपली चिमुकली पावले टाकायची आहेत, ते लहानगे यांना तुमची नितांत गरज आहे, हे लक्षात असू द्या.दहीहंडी उत्सवाच्या दिवशी आपण ७-८ थर ही लावता, परंतु त्या दिवशी आपल्या सुरक्षिततेसाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसते. आपणच आपली स्वत:ची काळजी घेतो. थरांवर थर रचतो, पण थरातील दुसऱ्याच्या चुकीमुळे तिसऱ्यालाच जीव गमवावा लागतो किंवा गंभीर दुखापत होते. या उत्सवाचे बाजारीकरण करण्यामागे स्पर्धा आणि उत्सव स्पर्धा वाढविण्यास आयोजक कारणीभूत आहेत. ते आयोजक आपल्या सुरक्षेबाबत आजदेखील काही बोलत नाहीत किंवा पूर्ण जबाबदारी घेत नाहीत.वीस फुटांवर दहीहंडी बांधायची आहे, त्याने उत्सव समाप्त होत नाही. उत्सवावर बंदी येत नाही, हे सर्वांनाच माहीत आहे. मग आयोजक आपल्या चार ते पाच थरांच्या सलामीला का तयार होत नाहीत? त्यांना दहीहंडी रद्द करण्याचे कारणच काय? वीस फुटांवरील दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या गोविंदा पथकांचे तेवढ्याच भव्य-दिव्यपणे स्वागत केले जाईल. त्यांना योग्य मानधन दिले जाईल, अशी घोषणा एकही आयोजक का करीत नाही? अनेक लोकप्रतिनिधीच उत्सवाच्या व्यापारीकरणासाठी, स्वत:ला प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि आपली व्होटबँक भरण्यासाठी गोविंदांचा सर्रास वापर करतात. गोविंदांना एकच आवाहन आहे, कशाला न्यायालयाने सांगितले पाहिजे? आपण स्वत: विचार करा. आपला स्वत:चा, आपल्या मित्रांच्या कुटुंबांचा आणि आपल्या गोविंदा पथकांचा. कारण आपल्यातीलच एखादा गोविंदा अपंग झाला किंवा मृत्यू झाला, तर आपणही ते दु:ख अखेरपर्यंत विसरू शकत नाही, परंतु या निष्ठुर आयोजकांना या नेत्यांच्या हृदयाला मात्र पाझर फुटत नाही.
काळजी वाटते कारण...
By admin | Published: August 21, 2016 3:02 AM