पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात सुरू केलेल्या मोर्चेबांधणीमुळे काँग्रेसच्या गोटात चिंता व्यक्त केली जात आहे. पक्षाच्या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराला उपस्थित राहिलेल्या काही आजीमाजी पदाधिकाऱ्यांकडूनच तसे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचा वारू रोखला नाही व आघाडी झालीच तर पुणे लोकसभेची जागा पक्षाकडून राष्ट्रवादीच्या पारड्यात जाण्याची भीती त्यांच्याकडून बोलून दाखवली जात आहे.अखिल भारतीय काँग्रेस महासमितीने दिलेल्या आदेशानुसार पक्षाच्या वतीने आजी-माजी पदाधिकाऱ्यांसाठी नुकतेच दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. मात्र त्या शिबिराची अपेक्षित हवा झालीच नसल्याची प्रतिक्रिया आता येत आहे. दिल्लीहून खास महासमितीने पाठवलेले प्रशिक्षकही या प्रतिसादाने फारसे समाधानी नव्हते, असे मत या शिबिरात सहभागी झालेल्या एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केले. शिबिर सुरू झाले कधी व संपले कधी हेच समजले नसल्याचे काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे. महापालिकेच्या निवडणुकीत २९ जागांवरून पक्ष थेट ९ जागांवर आल्यापासून काँग्रेसभवनमध्ये सातत्याने माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांची आठवण काढली जात आहे. या प्रशिक्षण शिबिराच्या वेळीही अनेकांनी त्यांच्या काळाचे स्मरण करत ते असते तर सगळ्या पुण्यात शिबिराची चर्चा झाली असती, असे मत व्यक्त केले. कार्यकर्ते, पदाधिकारी यांना जवळ करून त्यांच्या माध्यमातून पक्षाला प्रसिद्धी मिळवण्याची त्यांची पद्धत, तसेच काम गाजवण्याचा त्यांचा प्रकार यातून पक्ष सातत्याने चर्चेत राहत होता. आता मात्र पक्षाच्या जाहीर कार्यक्रमांचीही कधी चर्चा होत नाही, अशी खंत कार्यकर्त्यांमध्ये आहे.पक्षाच्या नेत्यांकडूनच जुने कार्यकर्ते, पदाधिकारी यांना दुखावले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. तक्रार केल्यानंतरही त्याची दखल घेतली जात नाही, असाही कार्यकर्त्यांचा अनुभव आहे. मध्यंतरी थेट काँग्रेसभवनमध्येच दोन पदाधिकाऱ्यांमध्ये थेट जाहीरपणे झालेल्या भांडणाचा संदर्भ यासाठी देण्यात येत आहे. बहुसंख्य काँग्रेसजनांना राष्ट्रवादी काँग्रेस मारत असलेल्या मुसंडीने जास्त चिंतीत केले असल्याचे वातावरण आहे. पाणी, इंधन दरवाढ, मंत्र्यांच्या वक्तव्यांचा निषेध अशा विविध कारणांनी मोर्चे, आंदोलने केली जात आहेत. धरणे धरली जात आहेत. सन २०१९ ची लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन त्याचा जोर वाढवला जात आहे. त्याचीच चिंता काँग्रेसजनांना भेडसावते आहे. राष्ट्रवादीबरोबर होत असलेल्या आघाडीत पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडे आहे. मागील वेळी प्रदेश युवक काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष विश्वजित कदम यांनी पुणे लोकसभेची जागा लढवली, मात्र त्यांना अपेक्षापेक्षा एकदम कमी मते मिळाली. त्याचाच आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही जागा मागितली जात आहे. काँग्रेसला ती द्यायची नाही, मात्र पक्षसंघटन, महापालिकेतील सदस्य संख्या असा विचार करता ही जागा राखायची कशी, असा प्रश्न काँग्रेसमध्येच अनेकांना पडला आहे. आघाडी झालीच तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडूनच पुणे लोकसभा मतदारसंघावर पाणी सोडले जाण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. नगर जिल्ह्यातील नगर दक्षिण ही लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांना चिरंजीव डॉ. सुजय विखे यांच्यासाठी ही जागा हवी आहे. त्या बदल्यात पुणे लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला द्यायची अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळेही काँग्रेसच्या गोटात चिंता असून तसे झाले तर पुण्यात काँग्रेसचे अस्तित्वच राहणार नाही, असे त्यांना वाटते आहे............चव्हाण विखे सख्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण काही महिन्यांपूर्वी काँग्रेसभवनमध्ये आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभेच्या जागेवर जाहीरपणे केलेल्या दाव्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी अजून आघाडीचीच चर्चा नाही तर जागा वाटप कसले, असा प्रतिप्रश्न केला होता. या विषयावर दुसरे काहीही बोलणे त्यांनी टाळले होते. विखे व अशोक चव्हाण यांची दुसऱ्या पिढीची जवळीक असून तिसऱ्या पिढीत ते सख्य उतरल्यास पुणे लोकसभेच्या जागेवर पाणी सोडले जाईल, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात आहे.
शहर काँग्रेसच्या गोटात राष्ट्रवादीमुळे चिंता : लोकसभेची जागा जाण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 3:30 PM
आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादी पक्षातर्फे ज्याप्रकारवे मोर्चेबांधणी शहरात सुरु आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण असल्याची चर्चा आहे.
ठळक मुद्देपक्षाचे अस्तित्व पणाला महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस २९ जागांवरून थेट ९ जागांवरपक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडूनच पुणे लोकसभा मतदारसंघावर पाणी सोडले जाण्याची शक्यतासंघटन, महापालिकेतील सदस्य संख्या असा विचार करता ही जागा राखायची कशी, असा प्रश्न पक्षाच्या नेत्यांकडूनच जुने कार्यकर्ते, पदाधिकारी यांना दुखावले जात असल्याची भावना निर्माण