मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाचा धोका गंभीर पातळीवर पोहचला आहे. आठवडाभरात नव्या कोरोनाबाधितांची संख्या तब्बल ३१ हजार २७ ने वाढली आहे. तर शुक्रवारी दिवसभरात ६ हजार ११२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील सक्रिय रूग्णांची संख्या ४४ हजार ७६५ झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर, हात स्वच्छ ठेवणे आणि शारीरिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन सरकारने केले आहे.मागच्या आठवड्यात कोरोनाबाधितांचा आकडा निम्म्यावर म्हणजे ३ हजार ६७० इतका होता. आठवडाभरात नव्याने बाधितांचा आकडा रोजच्या रोज वाढत चालला आहे. कोरोना बाधितांच्या संख्येने गुरूवारी दोन महिन्यांतील उच्चांकी संख्या गाठली होती. ५,४२७ नवे रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. शुक्रवारची स्थिती त्याहून गंभीर बनली आहे. दिवसभरात ६ हजार ११२ नवे रूग्ण आढळून आल्याने लाॅकडाऊनच्या काळातील स्थिती निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे नव्या बाधितांची संख्या वाढत असताना बरे होणाऱ्यांची संख्याही कमी होत असल्याचे चित्र आहे.
वर्ध्यातही ३६ तासांची संचारबंदीवर्धा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित महाविद्यालये वगळता इतर सर्व शाळा व महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. कोराेनाची साखळी तोडण्यासाठी शनिवार २० फेब्रुवारी रात्री ८ वाजेपासून ते सोमवार २२ फेब्रुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत वर्धा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.