मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठ्ठलाची पूजा कोणी करावी, कशी करावी आणि कोणी करू नये यावरून जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात आहे, तो निषेधार्थ आहे. त्यामुळे विठ्ठलाची पूजा वारकरी परंपरेनुसार व्हावी त्यात देवस्थान समितीची मनमानी नको, असा इशारा महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाने दिला आहे.कोणीही विठ्ठलाच्या नित्यपूजेचे राजकारण करू नये. देवस्थान समितीचे काम मंदिराचे व्यवस्थापन पाहण्याचे आहे. मनमानी करून तेथील वारकरी संप्रदायाची प्रथा, परंपरा, धार्मिकता मोडण्याचा अधिकार समितीला नाही. त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या प्रथा-परंपरेनुसार विठ्ठलाची नित्यपूजा झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे उपाध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर शास्त्री महाराज यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. वारकरी महामंडळाने विठ्ठल मंदिर बडव्यांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी राज्यभर आंदोलन केले होते. वारकरी महामंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय देवस्थान समितीने कोणताही निर्णय घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.सध्या विठ्ठलाची पूजा विशिष्ट लोकांना करू द्यावी, तेथे महिला पुजारी असावेत, पुजार्यांनी धोतर न घालता पांढरी विजार, पांढरा शर्ट व टोपी घालावी, मंदिरात पुरुषसुक्ताचे वा वेदमंत्र म्हणू नयेत, आदी मनाला येईल तशा मागण्या केल्या जात आहेत. धर्मशास्त्रानुसार प्रत्येक देवाची पूजा करण्याची पद्धती ठरलेली असते. प्रथा-परंपरेनुसारच विठ्ठलाची पूजा झाली पाहिजे.ज्या वारकरी महामंडळाने बडव्यांची मनमानी संपवण्यासाठी आंदोलन केले, त्या वारकरी महामंडळाला देवस्थान समिती विश्वासात का घेत नाही, यात राजकीय हितसंबंध दडलेला आहे का, देवस्थान समितीचे सर्व विश्वस्त हे वारकरी असले पाहिजेत, तर देवस्थानाचे पावित्र्य जपण्याचा योग्य निर्णय घेऊ शकतील.(प्रतिनिधी)...नाहीतर पुन्हा आंदोलन!विठ्ठलाची पूजा करणारा पुजारी निर्व्यसनी, मासांहारयुक्त, सदाचारी, माळकरी, वारकरी, विठ्ठलाचा भक्त आणि विठ्ठलाच्या पूजेचा पाच वर्षे अनुभव असला पाहिजे. यामध्ये कोणत्या जातीच्या लोकांनी पूजा करून नये याला विरोध नाही. त्यामुळे देवस्थान समितीने राजकारण करून विठ्ठलाची अवहेलना होईल, अशी कोणतीही कृती करू नये अन्यथा वारकर्यांना पुन्हा एकदा तीव्र आंदोलन पुकारावे लागेल.
विठ्ठलाची पूजा वारकरी परंपरेनुसार व्हावी
By admin | Published: May 11, 2014 6:35 PM