कोल्हापूर : वारणा सहकारी दूध संघाने आता अर्धा लिटर दुधाच्या पिशवीसोबत बोर्नव्हिटाचा पाच रुपयांचा पाऊच मोफत देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेला मुंबईत ग्राहकांकडून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सकस व दर्जेदार दूध उत्पादनात वारणा दूध संघ गेली अनेक वर्षे आपला नावलौकिक कायम राखून आहे. वारणा दूध संघ नुसत्या दूध विक्रीवरच थांबलेला नाही. तो श्रीखंड, तूप, दही अशा विविध उपपदार्थ निर्मितीमध्ये वेगळी ओळख निर्माण करून आहे. ही सर्व उत्पादने वारणा या ब्रँडवर लोकांच्या पसंतीस पडत आहेत. सहकार क्षेत्रात अनेक अभिनव प्रयोग यशस्वी करणारा हा समूह आहे. आमदार विनय कोरे या समूहाच्या माध्यमातून ग्राहकांसाठी सातत्याने चांगल्या योजना देत आले आहेत. वारणा दूध संघात गेली २५ वर्षे बोर्नव्हिटाचे उत्पादन होते. एका जागतिक दर्जाच्या ब्रँडसोबत राहून वारणेनेही आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. सध्या कोरोनाच्या काळात प्रतिकारशक्ती वाढविण्याचे अनेक उपाय तज्ज्ञांनी सुचविले आहेत. त्यांचा आधार घेऊनच बोर्नव्हिटा व वारणा दूध संघाने एकत्रितपणे ही योजना सुरू केली आहे. त्यास ग्राहकांकडून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी सांगितले. ‘सर्वाधिक श्रीखंड विक्री करणारा दूध संघ’ असाही ‘वारणा’चा लौकिक आहे, असेही ते म्हणाले.