आदित्यराज घोरपडे , हरिपूर (सांगली) -
कुस्ती म्हणजे महाराष्ट्राचा रांगडा खेळ. त्यातही पश्चिम महाराष्ट्रातील लाल मातीवरची कुस्ती जास्तच रांगडी. अलीकडे मात्र ज्या लाल मातीने हत्तीच्या ताकदीचे मल्ल दिले, त्या मातीशीच गद्दारी होताना दिसत आहे. स्वत:ला वस्ताद (प्रशिक्षक) म्हणवणार्या काही मंडळींना एजंटगिरीची चटक लागली आहे. त्यामुळे ही लाल माती काळवंडत चालली आहे. गणपत शिंदे, सखाराम वखारवाले, बाबू बिरे, दुंडाप्पाण्णा खोकले हे जुन्या काळातील गाजलेले वस्ताद. कदाचित ही नावे अनेकांना माहीतही नसतील. मात्र, याच वस्ताद मंडळींनी हत्तीच्या ताकदीचे अनेक मल्ल घडवले. कुस्त्या ठरवणे, पहिलवानांना लढतीपूर्वीच मानधनाची टक्केवारी ठरवून देणे, मर्जीतील लोकांची पंच म्हणून नियुक्त्या करणे, मैदानाचे पोस्टर तयार करणे, मैदानात उपस्थित असलेले मान्यवर मल्ल व पंचांना वाटखर्चाचे वाटप करणे आदी कामे म्हणजे कुस्ती मैदानाचे ‘संपूर्ण मॅनेजमेंट’ काही वस्ताद मंडळी करीत आहेत. अर्थातच हे काही एकट्या दुकट्याचे काम नाही. एजंटगिरी करणार्या प्रत्येक वस्तादाची ‘टीम’ ठरलेली आहे. माती उकरणार्यांपासून पंचांपर्यंत सर्व काही ‘सेट’ असते. पंजाब-हरियाणातील शे-दीडशे किलो वजनाच्या सुस्त मल्लास महाराष्ट्रात आणायचे आणि लढवायचे, ही खेळी खेळली जात आहे. पैलवानांची ‘पाकीटमारी’ होत असून त्यांच्या बक्षिसाच्या मलईवर एजंटरूपी बोके बिनधास्त ताव मारत आहेत. काही अपवाद वगळता गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या कुस्ती मैदानात हेच सुरू आहे. गावोगावहून कुस्त्या बघण्यासाठी येणार्या कुस्तीशौकिनांच्या भावनांशी खेळले जात आहे. कुस्त्या जोडून लाखो रुपयांची माया गोळा करणारे वस्ताद तुपाशी आहेत. बक्षिसाच्या तोकड्या रकमेमुळे पहिलवान मात्र उपाशी आहेत. कुस्ती मैदानात हजेरी लावणार्या अनेक बड्या धेंडांच्या नावासमोर अस्तित्वात नसलेल्या उपाध्या लावून स्तुतिसुमने उधळली जातात. कुस्तीचा धंदा करू पाहणार्यांची ही सर्व मिलीभगत आहे. याविरुद्ध आवाज कोण उठवणार, कुस्तीशौकिनांच्या डोक्यात प्रकाश कधी पडणार, कुस्तीचे भाग्यविधाते म्हणवणारे कोठे आहेत, असे प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत.