ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 21 - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेशी आघाडी केली व नगरपालिकेत बहुमत मिळविले. पण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मात्र कोल्हापूर दक्षिण मतदार संघात मी बांधत असलेली सर्व पक्षीयांची मोट त्यांना का मान्य नाही हे अनाकलीय आहे. कदाचित माजी गृहराज्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून त्यांनी ही भूमिका घेतली असावी, अशी बोचरी टीका खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी केली.
जिल्ह्यांत राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार परंतू दक्षिण विधानसभा मतदारसंघात मात्र अलिप्त राहणार असल्याचे महाडिक यांनी म्हटले आहे. एका बाजूला मुश्रीफ हेच पक्षाचे सर्वेसर्वा नेते असून त्यांच्याबध्दल आदर असल्याचे सांगत महाडिक यांनी त्यांच्याच भूमिकेवर बोट ठेवल्याने या दोन नेत्यांतील दुही वाढण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीच्या मुलाखतीवेळी खासदार महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजप बरोबर आघाडी करणार असल्याची भूमिका मुश्रीफ यांच्या समोरच गुरुवारी जाहीर केली.
पण त्यास मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेवून विरोध केला व कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस सोबतच आघाडी करणार असल्याचे जाहीर केले. त्यास हरकत घेणारे पत्रक खासदारांनी शनिवारी प्रसिध्दीस दिले. खासदार महाडिक म्हणतात,‘दक्षिण मतदार संघात सर्वपक्षीयांची मोट बांधून राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळ चिन्हांवर निवडून आणण्याचा प्रयत्न असेल,असे विधान मी केले होते. मात्र त्यानंतर आमदार मुश्रीफ यांनी दक्षिणमध्ये राष्ट्रवादीची युती काँग्रेसबरोबर राहील असे जाहीर केले आहे. आमदार मुश्रीफ हे ज्येष्ठ नेते आणि सर्वेसर्वा असल्याने मी त्यांच्या भूमिकेचा आदर करतो. त्यामुळे त्यांच्या निर्णयाला विरोध करण्याचा प्रश्र्नच उदभवत नाही. तथापि मला आश्चर्य वाटते की, कागल आणि राधानगरी भूदरगड वगळता, जिल्ह्यातील उर्वरित सर्व तालुक्यात राष्ट्रवादीने भाजपशी आघाडी केली आहे.
खुद्द आमदार मुश्रीफ यांनी नगरपालिका निवडणूकीत कागलमध्ये शिवसेनेशी हातमिळवणी केली होती. आताही आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी खासदार निवेदिता माने आणि मानसिंग गायकवाड यांच्या गटाने सुध्दा भाजपशी आघाडी करण्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्तीत जास्त उमेदवारांना जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत विजयी करण्यासाठी अशी रणनीती आखली आहे. परंतू मुश्रीफ यांनी काँग्रेसशी युती करण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या निर्णयाचा मान राखत मी कोल्हापूर दक्षिण मतदार संघात अलिप्त राहून अन्य तालुक्यात मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहीन.’
मुश्रीफ यांची भूमिका माजी गृहराज्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून?
दक्षिणमधील आघाडीबाबत मुश्रीफ साहेब यांची माजी गृहराज्यमंत्री यांच्यात चर्चा झाली असावी आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने, राष्ट्रवादीच्या चिन्हांवर निवडणूक लढवणारे कोल्हापूर दक्षिण मधील उमेदवार निवडून आणू असे आश्वासन माजी गृहराज्यमंत्र्यांनी दिले असावे, असा माझा अंदाज आहे. त्यामुळेच आमदार मुश्रीफ यांनी दक्षिणमध्ये काँग्रेसशी आघाडी करू अशी भूमिका घेतली असावी, असा माझा अंदाज आहे..असाही टोला महाडिक यांनी या पत्रकात लगावला आहे.