सुधीर लंके
अहमदनगर: श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यावर सध्या निवडणुकीचे एक मोठे शाळाबाह्य कामकाज येऊन पडले आहे. ‘लोकनेते बबनराव पाचपुते’ ‘माझा पाचपुते यांच्या बरोबरचा अनुभव’ ‘पाचपुते व तालुक्याचा विकास’ अशा विषयांवर पहिली ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निबंध लिहायला लावून पाचपुते यांनी थेट इयत्ता पहिलीपासून प्रचार सुरु केला आहे.
पाचपुते हे राज्यातील एक बडे नेते आहेत. श्रीगोंदा मतदारसंघात ते भाजपकडून निवडणुकीची तयारी करत आहेत. गत विधानसभेला राष्टÑवादी काँग्रेसने त्यांचा पराभव केला. प्रत्येक निवडणुकीत वेगळे चिन्ह ही पाचपुते यांची खास ओळख आहे. बबनरावांची ही ख्याती आता थेट शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासावी लागणार आहे. कारण, त्यांच्या अधिपत्याखालील ‘परिक्रमा’ शैक्षणिक संकुलाने शाळांतील वेगवेगळ्या वयोगटासाठी निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे विषय मोठे अफलातून आहेत. ‘लोकनेते बबनराव पाचपुते’, ‘माझा बबनराव पाचपुते यांच्यासोबतचा अनुभव’, ‘वारी आणि ह.भ.प. बबनराव !’पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीही हेच विषय आहेत. या विद्यार्थ्यांचा वरचा दर्जा विचारात घेऊन ‘बबनराव पाचपुते यांचे पाण्यासाठी योगदान’, ‘पाचपुते यांची राजकीय वाटचाल व तालुक्याचा विकास’ अशा विषयांची भर घालण्यात आली आहे. हेच विषय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आहेत. त्यामुळे पहिलीच्या विद्यार्थ्यांनीही ‘पाचपुते कोण’ असा प्रश्न शिक्षकांना विचारायला सुरुवात केली आहे. या प्रत्येक गटासाठी पारितोषिकही आहे.निबंध स्पर्धेबाबत परिक्रमाचे अमोल खेडकर यांच्याशी संपर्क साधला असता अशी स्पर्धा आयोजित केली असल्याचे मान्य करत आत्तापर्यंत एक हजार निबंध आले असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. चांगले निबंध वाचण्यासाठी द्या, अशी मागणी केल्यावर बक्षीस वितरणानंतर ते खुले केले जातील, असे ते म्हणाले.