मुंबई: सर्व शिक्षा अभियानातील 'समर्थ श्री रामदास स्वामी' पुस्तकातील संभाजी महाराजांच्या वादग्रस्त उल्लेखाबद्दल प्रकाशक आणि लेखिकेनं माफी मागितली आहे. ‘संभाजी राजा हा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता’ असा वादग्रस्त उल्लेख पुस्तकात असल्याचं समोर आलं होतं. याबद्दल संभाजी ब्रिगेडनं तीव्र आक्षेप नोंदवला होता. सर्व शिक्षा अभियानात 'समर्थ श्री रामदास स्वामी' या पुस्तकाचा समावेश आहे. डॉ. शुभा साठे यांनी हे पुस्तक लिहिलं असून नागपूरातील लाखे प्रकाशनानं ते प्रकाशित केलं आहे. या पुस्तकावरील 18 व्या क्रमांकावर संभाजी महाराजांचा उल्लेख आहे. ‘रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या- खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले’, असा मजकूर या पुस्तकात आहे. यावर मोठा वाद निर्माण झाला. पुस्तकातील मजकूर संभाजी महाराजांची बदनामी करणारा असल्याचा आक्षेप संभाजी ब्रिगेडनं घेतला. त्यानंतर लेखिका डॉ. शुभा साठे आणि प्रकाशनानं याबद्दल माफी मागितली. संभाजी महाराज दारुच्या कैफात होते, या वाक्यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला होता. कुठलाही पुरावा नसताना छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यात येत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखाल करण्याची मागणीदेखील करण्यात आली होती. असा चुकीचा आणि अपमानास्पद मजकूर शालेय प्राथमिक पुस्तकात छापला जातो, हे दुर्दैवी आहे, असं संभाजी ब्रिगेडनं म्हटलं होतं.
संभाजी महाराजांविषयीच्या आक्षेपार्ह उल्लेखाबद्दल लेखिका, प्रकाशकांचा माफीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 3:01 PM