सुधा मूर्ती यांनी कोल्हापुरमधील आपल्या जुन्या घराला भेट दिली. कोल्हापुरातील आपल्या ७० वर्षांपूर्वीच्या जुन्या वास्तव्याच्या जागा शोधून काढून सोमवारी आठवणींची पानं उलगडली. त्यांच्यासोबत त्यांच्या मोठ्या भगिनीही होत्या. दरम्यान, त्यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांची भेट घेतली. तसंच त्या त्यांच्या पायाही पडल्या. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबईतील एका महिला पत्रकाराने संभाजी भिडे यांना प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी त्यांनी आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलतो, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यानंतर अनेकांनी या वक्तव्यावर टीकाही केली होती. सुधा मूर्ती या सोमवारी सांगलीमध्ये होत्या. यावेळी त्यांनी संभाजी भिडे यांची भेट घेतली, तसंच त्या त्यांच्या पायाही पडल्या.अंबाबाईचं दर्शनही घेतलंसुधा मूर्ती आणि त्यांच्या भगिनी मंगला कुलकर्णी यांनी कोल्हापुरातील दोन दिवसांच्या मुक्कामात रंकाळा, अंबाबाईचे दर्शन तर घेतलेच, पण प्रकाशक अनिल मेहता यांच्या पुस्तकालयात आणि त्यांच्या घरातही पाहुणचार घेतला. मूर्ती यांना खरी ओढ होती, ती ७० वर्षांपूर्वी आपले बालपण जिथे गेले, ते घर पाहण्याची. वडिलांनी आयुष्यभराची पुंजी गुंतवून वास्तव्य केलेल्या घराला भेट दिल्यानंतर, त्यांना जणू तीर्थयात्राच घडल्यासारखं वाटलं.कुरुंदवाड येथील घरीही दिली भेटमोडकळीस आलेले वासे, तुळ्या आणि लोंबकळणारी जळमटं यातून वाट काढत सुधा मूर्ती यांनी कुरुंदवाड येथील आपल्या घराची पाहणी करीत आठवणींना उजाळा दिला. माझे घर, येथील जिव्हाळा कधीच विसरू शकत नाही, कोल्हापूरची कन्या असल्याचा सार्थ अभिमान आहे, अशी भावना सुधा मूर्ती यांनी व्यक्त केली. त्यांनी नृसिंहवाडीतील श्रीदत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतले.