मुंबई : भाजपच्या दोन केंद्रीय मंत्र्यांच्या नावाने बनावट लेटरहेड बनवून रेल्वे तिकिटांचे आरक्षण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील दक्षता पथक आणि आरपीएफकडून ( रेल्वे सुरक्षा दल) ही बाब उघडकीस आणण्यात आली असून गृहमंत्री राजनाथ सिंह आणि महिला व बालविकास मंत्री मनेका गांधीच्या नावाने ही ब नावट लेटरहेड असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत बनावट लेटरहेडचा फास्ट ट्रेनची सोळा तिकिटे मिळविण्यासाठी उपयोग करण्यात आला. या विरोधात कल्याण जीआरपीमध्ये (गर्व्हमेन्ट रेल्वे पोलिस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून सरवर नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. तर मोहम्मद निगार, मनोज सिंह आणि इकबाल या तीन जणांची चौकशी सुरु आहे. यातील मोहम्मद निगार हा बनावट लेटरहेड घेवून मध्य रेल्वेच्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडे गेला आणि हे लेटरहेड सादर केले. मात्र लेटरहेड दोन केन्द्रीय मंत्र्यांची असल्याने अधिकाऱ्यांना याबाबत संशय आला आणि त्यांनी राजनाथ सिंहाच्या लेटरहेड संदर्भात गृहमंत्रालयाकडे संपर्क साधला आणि त्यावेळी सादर करण्यात आलेली लेटरहेड बनावट असल्याचे उघडकीस आले. तसेच यासंदर्भात मेनका गांधी यांच्या महिला व बाल विकास खात्याकडेही चौकशी केली असता ते लेटरहेड बनावट असल्याचे उघड झाले. एकूण प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मध्य रेल्वे आरपीएफ आणि दक्षता पथकाने या सर्वांना रंगेहाथ पकडण्यासाठी एक सापळा रचला आणि राजनाथ सिंह यांच्या दोन लेटरहेडवरील (एलटीटी-वाराणसी एक्सप्रेस आणि कुशीनगर एक्सप्रेस) आणि मेनका गांधी यांच्या एका लेटरहेडवरील तिकिट (काशी एक्सप्रेस) रेल्वेकडून कन्फर्म करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित निगार आणि सरवर यांना ट्रेनमधून पकडण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
राजनाथ, मनेकांच्या नावाने बनावट लेटरहेड
By admin | Published: April 23, 2015 5:02 AM