नाशिक : जिल्हा परिषदेत समविचारी पक्षांशी आघाडी करण्याऐवजी चुकीच्या लोकांना महत्त्व दिले गेल्याने पक्षातील निष्ठावान कार्यकर्ते नाराज झाले, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे सांगत माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांनी माजी पालकमंत्री आ. छगन भुजबळांवर शरसंधान साधले.वास्तविक पाहता राज्यात सर्वच समविचारी पक्षांशी आघाडी असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कॉंग्रेस सोडून अन्य लहान पक्षांना नको तितके महत्त्व दिल्याने त्यांनी जिल्हा परिषदेत पाठिंबा देतांना ‘निगोशिएशन’ करीत पदे मिळविल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. आम्हाला पक्षाने प्रत्येकासाठी क्षेत्र ठरवून दिले आहेत. मला सातारा पालकमंत्री आणि अन्य ठिकाणी काम दिल्याने आपण तिथे काम केले. आम्ही कोणाच्या कामात लुडबूड करीत नाही, मात्र नाशिकला जे झाले चुकीचे झाले,असे आपले वैयक्तिक मत असल्याचे सांगत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. पक्षाने छगन भुजबळांना काय कोणालाच वाऱ्यावर सोडलेले नाही. माझ्यासकट सुनील तटकरे यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत. आम्ही चौकशीला सहकार्य करीत आहोत. आम्ही वकिलांच्या सल्ल्याने काम करीत आहोत. आज छगन भुजबळ तुरुंगात असल्याने ते दोषी ठरत नाहीत. मात्र तुरुंगातील व्यक्तीविषयी जनतेच्या मनात पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, असे सांगत त्यांनी भुजबळांची प्रतिमा पक्षाच्या फलकांवरून हटविण्याचे अप्रत्यक्षरीत्या एकप्रकारे समर्थनच केले. भुजबळांसह दोन्ही माजी खासदार तुरुंगात असल्याने पक्षाला स्थानिक नेतृत्व उरले नसल्याबाबत विचारणा केली असता, पक्ष कोणा एकावर चालत नसतो. नाशिकला तर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार येऊन गेले. आ. जितेंद्र आव्हाड प्रभारी आहेत. मी स्वत: आज आलो आहे. आता पक्षाने सामुदायिक नेतृत्व स्वीकारले आहे. पक्षात आता सामुदायिक निर्णय घेत असल्याचे माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांनी सांगितले. स्व. आर. आर. पाटील हे स्वच्छ प्रतिमेचे नेते होते.
जिल्हा परिषदेत चुकीच्या गोष्टी घडल्या- अजित पवारांचे भुजबळांवर शरसंधान
By admin | Published: February 01, 2017 2:22 PM