अनिल भापकर/ऑनलाइन लोकमत
दिवसेंदिवस मोबाईल टेक्नॉलॉजी ने माणसाचे जीवन व्यापून टाकले आहे.मोबाईल शिवाय माणसाचा दिवस सुरू होत नाही आणि दिवसाचा शेवटही मोबाईल शिवाय होत नाही .त्यामुळे आता मोबाईल वापरताना काही गोष्टी फार महत्वाच्या झाल्या आहेत त्या म्हणजे इंटरनेट चा स्पीड आणि मोबाइल चा बॅटरी बॅकअप. मात्र पूर्वी म्हणजे फार फार ततर दहा-बारा वर्षांपूर्वी मोबाईल म्हणजे फक्त वायरलेस टेलिफोन अर्थात लँडलाईन ला पर्याय असाच होता . फार फार तर कॉल करण्यासोबतच एसएमएस चा वापर मोबाईल मध्ये होऊ लागला होता . त्यामुळे त्यावेळी बॅटरी बॅकअप हा काही महत्वाचा विषय त्यावेळी नव्हता . एकदा मोबाईल चार्ज केला कि दोन दिवस परत मोबाईल चार्ज करायची गरज पडत नसे.
मात्र जेव्हा पासून मोबाईल स्मार्टफोन झाला तेव्हा पासून स्मार्टफोन म्हणजे पीसी अर्थात कॉम्पुटर ला पर्याय म्हणून वापरले जाऊ लागला . त्यामुळे इंटरनेट स्पीड आणि बॅटरी बॅकअप या दोन गोष्टीला या स्मार्टफोन च्या जमान्यात फारच महत्व आले. इंटरनेट स्पीड ची समस्या काही प्रमाणात फोरजी च्या जमान्यात बऱ्यापैकी सुधारली आहे मात्र बॅटरी बॅकअप ही समस्या मात्र अजूनही स्मार्टफोन युझर्सला बऱ्यापैकी सतावते आहे. त्यासाठी मग पर्याय म्हणून अनेक कंपन्यांनी आपल्या स्मार्टफोन ची बॅटरी कॅपॅसिटी वाढवायला सुरुवात केली तर काही स्मार्टफोन युझर्स बॅटरी बँक चा पर्याय वापरू लागले . तरी सुद्धा स्मार्टफोन चार्जिंग ही समस्या काही प्रमाणात आहेच .
मात्र आता वाय -चार्ज नावाचे असे एक तंत्रज्ञान येऊ घातले आहे ज्यामुळे स्मार्टफोन अर्थात स्मार्टफोन फॅमिली म्हणजेच स्मार्टफोन सह टॅब ,डिजिटल वॉच ,विअरेबल डिव्हाइसेस आदींचाही चार्जिंगची समस्या दूर होणार आहे.
काय आहे वाय-चार्ज तंत्रज्ञान ?
वाय -चार्ज तंत्रज्ञान हे दोन भागात विभागले गेले आहे एक म्हणजे ट्रान्समीटर युनिट आणि दुसरे म्हणजे रिसिव्हर युनिट. यामध्ये पॉवर ही इन्फ्रारेड बीम च्या साहाय्याने ट्रान्सफर केली जाते. म्हणजे ट्रान्समीटर युनिट हे आपल्या घरात किंवा ऑफिस मध्ये ए सी किंवा डीसी किंवा यूएसबी पॉवर पॉईंट ला जोडलेले असते . तर दुसरे म्हणजे रिसिव्हर युनिट हे स्मार्टफोन किंवा जे डिव्हाईस चार्ज करायचे आहे त्याच्या चार्जिंग पोर्ट मध्ये लावलेले असते किंवा काही स्मार्टफोनमध्येच हे असते.यामध्ये ट्रान्समीटर युनिट हे फार स्मार्ट असते ते आपल्या परिसरातील स्मार्टफोन किंवा इतर डिव्हाईस आपोआप हुडकून काढून लगेच त्याला चार्जिंग करायला सुरुवात करते. म्हणजे तुम्हाला तुमचा स्मार्टफोन चार्ज करायचा आहे हे लक्षात ठेवायची सुद्धा गरज नाही.