सिंधुदुर्ग, दि. 4 - मालवण समुद्रात शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मासेमारीसाठी गेलेली एक नौका बुडाली. सुदैवाने या नौकेतील पाचही मच्छीमारांना वाचवण्यात यश आले. किना-यावरील अन्य मच्छीमारांनी तत्परता दाखवल्यामुळे बुडालेल्या मच्छीमारांचे प्राण वाचले. नौकेतील मच्छीमारांना सुखरुप दांडी किनाऱ्यावर आणले. समुद्रात बुडालेल्या या मच्छिमारांना मोबाइलने तारले.
समुद्रात बुडालेल्या अवस्थेत बोटींचा आधार घेत एका मच्छीमाराने फोन लावून किनाऱ्यावरील मच्छिमार बांधवाना दुर्घटनेची माहिती दिली. किनाऱ्यावरील मच्छिमार बांधवांनी ४ ते ५ बोटींच्या मदतीने लगेच समुद्रात धाव घेतली. समुद्रात बुडालेल्या मच्छिमारांनी अंगावरील टी शर्ट उंचावून आपण नेमके कुठे फसलो आहोत त्याची माहिती दिली.
त्यानंतर अन्य बोटीवरील मच्छीमारांनी समुद्रात बुडणा-या मच्छीमारांना वाचवले. बुडालेल्या नौकेला दोरखंड बांधून अन्य नौकांच्या मदतीने ९ : ३० च्या सुमारास ४ तासाच्या थरारक प्रयत्नानंतर किनाऱ्यावर आणले. या दुर्घटनेत नौकेच जाळी व इंजिनचे काही प्रमाणात नुकसान झाले.