नागपूर : मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील सिद्धदोष आरोपी याकूब मेमन याच्या संदर्भात चकार शब्द काढू नका, असे स्पष्ट निर्देश आपल्याला शासनाने दिले आहेत. त्यामुळे मला याबाबत काहीही बोलता येणार नाही, असे सांगत राज्याच्या कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर दिले नाही.येत्या ३० जुलै रोजीची फाशीची शिक्षा टाळण्यासाठी याकूबची धडपड सुरू आहे. त्याने एकीकडे राज्यपालांकडे दयेचा अर्ज केला तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून ‘डेथ वॉरंट’ बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. अशातच मध्यवर्ती कारागृहात याकूबच्या फाशीची तयारी सुरू आहे. या घडामोडींमुळे सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर शनिवारी सकाळी नागपुरात आल्या. पोलीस जिमखान्यात त्यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी गाठले असता त्यांनी याकूब सोडून दुसऱ्या कोणत्याही विषयावर बोला, असे म्हटले. सरकार आणि कोर्टाने आपल्याला याकूबच्या विषयावर बोलण्यास मनाई केली आहे, त्यामुळे आपण काहीच बोलू शकत नसल्याचे त्या म्हणाल्या. याकूबच्या फाशीच्या तयारीचे काय, तुमचा दौरा कशासाठी आहे, आज काय करणार आहात, असे अनेक प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारले; मात्र त्यांनी यापैकी कोणत्याच प्रश्नाला उत्तर दिले नाही. (प्रतिनिधी)
याकूबबाबत भाष्य करण्यावर मनाई
By admin | Published: July 26, 2015 2:33 AM