मुंबई : १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी फासावर गेलेल्या याकुब मेमनची वहिनी व जन्मठेपेची शिक्षा ठोेठावलेल्या रुबिना मेमनची फर्लोवर सुटका केल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने तिची फर्लोवर सुटका करण्यास नकार दिला. रुबिनाला फर्लोवर सोडले तर याकुबच्या मृत्यूप्रकरणी अनेक नातेवाईक तिचे सांत्वन करण्यासाठी माहीमला येतील. त्यामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल, हा सरकारचा युक्तिवाद स्वीकारत न्या. व्ही.के. ताहिलरमानी व न्या. ए.एम. बदार यांनी मेमनचा अर्ज फेटाळला. साखळी बॉम्बस्फोटाच्या कटात सहभागी असल्याचे सिद्ध झाल्याने विशेष टाडा न्यायालयाने तिला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. फर्लोवर सुटका करण्यासाठी रुबिनाने मार्चमध्ये कारागृह प्रशासनाकडे अर्ज केला होता. रुबिना माहीमला आल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे माहीम पोलिसांनी अहवालात म्हटल्याने कारागृह प्रशासनाने तिचा अर्ज नामंजूर केला. त्यामुळे तिने पोलीस उपमहाअधीक्षकांकडे फर्लोसाठी अर्ज केला. मात्र त्यांनीही तिला दिलासा देण्यास नकार दिला. अखेरीस तिने उच्च न्यायालयात अर्ज केला. ‘अन्य आरोपींची फर्लोवर सुटका करण्यात आली. प्रत्येक दोषीला फर्लोवर सुटी घेण्याचा अधिकार आहे,’ असा युक्तिवाद मेमनच्या वकिलांनी केला. मात्र सरकारी वकिलांनी त्यावर आक्षेप घेतला. सरकारी वकिलांनी खंडपीठापुढे राज्य सरकारचे २०१२ चे परिपत्रक सादर केले.या परिपत्रकानुसार, दहशतवादी कृत्यात दोषी आढळलेल्याचा फर्लो मंजूर केला जाऊ शकत नाही. (प्रतिनिधी)
याकुब मेमनची वहिनी रुबिनाला फर्लो नाही
By admin | Published: December 23, 2016 3:48 AM