- नरेश डोंगरे , मुंबई / नागपूर
देश हादरवून सोडणाऱ्या १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील गुन्हेगार याकूब अब्दुल रज्जाक मेमन याला त्याच्या जन्मदिनीच फासावर लटकवून भारताकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या विघातक शक्तींना गुरुवारी सरकारने सणसणीत चपराक हाणली. राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्यानंतर रात्रभर सुप्रीम कोर्टात रंगलेल्या याचिकानाट्याची अखेर नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात गुरुवारी सकाळी ७ वाजता याकूबच्या मृत्युदंडाने झाली. वधस्तंभावर चढल्यानंतर याकूबने ‘‘या अल्लाह मुझे माफ करना’’ असे अखेरचे शब्द काढले. याकूबचा मृतदेह त्याच्या नातेवाइकांच्या हवाली करून कडेकोट बंदोबस्तात तो हवाईमार्गे मुंबईला रवाना करण्यात आला. मुंबईतील मरिन लाइन्सच्या बडा कब्रस्तानमध्ये सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी याकूबचे पार्थिव दफन करण्यात आले. ज्या मुंबईत त्याने आणि त्याच्या साथीदाराने बॉम्बस्फोट घडविले त्याच मुंबईत त्याला दफन करण्यात आले.अनेक नाट्यमय घडामोडींमुळे संपूर्ण जगाचे लक्ष या घटनेकडे लागून होते. दोन आठवड्यांपूर्वी टाडा कोर्टाने डेथ वॉरंट काढून याकूबच्या फाशीसाठी ३० जुलै ही तारीख निश्चित केली होती. मात्र त्यानंतर क्युरेटिव्ह पिटीशन, डेथ वॉरंटला आव्हान, राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे दयेचे अर्ज करून याकूबने मृत्युदंडाच्या शिक्षेतून माफी मिळविण्याचे सर्व कायदेशीर मार्ग अवलंबिले. मात्र सर्व दावे फेटाळण्यात आले. कायदेशीर प्रकिया पूर्ण झाल्याने डेथ वॉरंटनुसार नागपूरच्या कारागृहात याकूबच्या फाशीचे काउंटडाऊन सुरू झाले. २९ जुलैला रात्री करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी पहाटेपर्यंत युक्तिवाद सुरू होता. पहाटे ४.४५ च्या सुमारास सर्व दावे फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने फाशीवर शिक्कामोर्तब केले. हे वृत्त कळल्यानंतर नागपूर कारागृहात याकूबला मृत्युदंड देण्यात आला. याकूबला मृत्युदंड देण्यात आल्याचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले. याकूब म्हणाला... आय अॅम फिट!!पहाटे कारागृहातील सुरक्षारक्षकांनी त्याला आता शिक्षेची वेळ जवळ आल्याचे सांगताच याकूबने पुढच्या दोन तासांत धीरगंभीरपणे सारे काही आटोपले. मध्ये काही वेळेसाठी तो विचलित झाला होता. डॉक्टरांनी त्याला ‘तुझी वैद्यकीय तपासणी करायची आहे, असे सांगताच तो म्हणाला, डॉक्टरसाहब... आय अॅम फिट ! मात्र, डॉक्टरांनी त्याला नियमांची माहिती दिल्यानंतर त्याने तपासणी करून घेतली. वधस्तंभावर चढल्यानंतर तोंडावर बुरखा घालण्यापूर्वीपर्यंत तो शांत होता. शिक्षेची अंमलबजावणी होण्याच्या काही क्षणापूर्वी त्याने अल्लाहकडे माफी मागितली.याकूबसाठी रात्रभर जागून सुप्रीम कोर्टाने रचला इतिहासयाकूब मेमनला आणि त्याच्या वतीने इतरांना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत न्याय मागण्याची संधी देऊन न्यायसंस्थेने भारताचे नाव जगात उंचावले.हे करीत असताना सर्वोच्च न्यायालयाने याकूबच्या वतीने करण्यात आलेल्या शेवटच्या याचिकेवर गुरुवारी पहाटे सुनावणी घेऊन इतिहास रचला.सर्व न्यायालयीन प्रक्रिया संपल्याने फाशी आता अटळ आहे, असे म्हणत न्यायालयाने ही शेवटची याचिका गुरुवारी पहाटे ४.५० वाजता फेटाळली आणि त्यानंतर सकाळी याकूबला फासावर लटकविण्यात आले. पोलिसांनी मुंबई राखलीअभेद्य व्यूहरचना आणि तिची अचूक अंमलबजावणी या जोरावर मुंबई पोलिसांनी गुरुवारी शहरात एकही अनुचित प्रकार घडू दिला नाही. हजारोंची गर्दी उसळूनही अत्यंत मोकळ्या वातावरणात बॉम्बस्फोट मालिकेतील सिद्धदोष गुन्हेगार याकूब मेमनचा दफनविधी पार पडला. त्यामुळे जातीय दंगलीचे चटके अनुभवलेल्या मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तसेच चोख सुरक्षा राखल्याबददल मुंबई पोलिसांचे आभारही मानले.दिवस महत्त्वाचा होता. एखादी घटना घडली असती तर त्याचे पडसाद शहरासह राज्यात उमटले असते. मात्र तसे घडू नये, या जाणिवेने ३६ हजार पोलीस शिपाई आणि ५ हजार अधिकाऱ्यांनी अहोरात्र, डोळ्यांत तेल घालून कर्तव्य बजावले. आजचा दिवस शांततेत, मोकळ्या वातावरणात पार पडला याचे श्रेय संपूर्ण पोलीस दलाचे आहे. - राकेश मारिया, पोलीस आयुक्त, मुंबई