औरंगाबाद - मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवादी याकूब मेननच्या कबरीचं सुशोभिकरण करण्यात आले. कोविड काळात झालेल्या या सुशोभिकरणावरून आता नवा वाद पेटला आहे. त्यात भाजपानं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी किती व का तडजोड केली? याचं स्पष्टीकरण द्यावं असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. त्यावर आता शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेना नेते आणि राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या वादावर म्हटलं आहे की, याकूब मेननच्या कबरीचं उदात्तीकरण करणं दुर्देवी आहे. ज्याने कुणी हा प्रकार केला असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. परंतु अशाप्रकारे उद्धव ठाकरेंवर टीका करताना मसूदला अफगाणिस्तानला कुणी सोडलं? दाऊदला फरफटत भारतात आणू असं कोणत्या पक्षाचे नेते म्हणाले? निवडणुकीत सत्ता आल्यानंतर दाऊदला जेलमध्ये टाकू असं म्हटलं गेले मग अद्याप ते झाले नाही म्हणजे तुम्ही दाऊदला समर्थन करता का? असं आम्हालाही बोलता येते असं त्यांनी सांगितले.
तसेच याकूब मेननचं समर्थन मराठी माणूस, मुंबईकर करणार नाही. याकूबच्या कबरीचं उदात्तीकरण निषेधार्हच आहे. २०१४ पासून दाऊदला जेलमध्ये टाकू बोलता मग त्यांनी आजपर्यंत का आणलं नाही? तुमच्यात हिंमत नाही का? चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार नादानपणाचा आरोप करतायेत. याकूब मेननबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. ज्यांनी काश्मीरमध्ये मुफ्ती मेहबुबासोबत सत्ता उपभोगली त्यांनी आम्हाला शिकवू नये. ज्यांनी खुलेपणे पाकिस्तानचं समर्थन केले होते असा टोला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपा नेत्यांना लगावला आहे.
काय आहे वाद?१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेननच्या कबरीवर मार्बल आणि लायटींग लावण्यात आली आहे. मुंबईच्या बडा कब्रिस्तान येथील हा प्रकार आहे. मेननच्या कबरीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर यावरून उद्धव ठाकरे आणि भाजपात यांच्यात वादंग पेटला आहे. याकूब मेननच्या कबरीचं सुशोभिकरण महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाले. या कबरीचं उदात्तीकरण करणाऱ्यांची नावे समोर आली पाहिजे. हा देशद्रोहाचा प्रकार असून ज्यांनी कुणी सुशोभिकरणासाठी परवानगी दिली त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.