मुंबई : याकूबच्या दफनविधीआधी सकाळीच चंदनवाडीतील बडा कब्रस्तानमध्ये कबर खोदून तयार करण्यात आली होती. कब्रस्तानातील एका दर्ग्यासमोरील कडूनिंबाच्या झाडाखाली ही कबर खोदण्यात आली होती. कबरीच्या आजूबाजूला पोलिसांचा खडा पहारा होता. दुपारपर्यंत कुणालाही त्याठिकाणी फिरकू दिले नाही. कब्रस्तानच्या दोन्ही प्रवेशद्वारांचा कब्जा पोलिसांनी घेतला होता. मेटल डिटेक्टरच्या मदतीने पोलीस काहीही संशयास्पद वस्तू आत घेऊन जाण्यास मज्जाव करत होते. दुपारी तीन वाजल्यानंतर कब्रस्तानातील गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. सर्वसामान्यांना कब्रस्तानमध्ये प्रवेश देण्यात आला. सव्वाचार वाजता याकूबचा मृतदेह कब्रस्तानमध्ये आणण्यात आला. पावणेपाच वाजता ‘कुल की मिट्टी’(पार्थिवावर सोडण्यात येणारी माती) जमा करण्यास सुरुवात झाली.पाच वाजण्याच्या सुमारास याकूबचा जनाजा कबर असलेल्या ठिकाणी आणण्यास सुरुवात झाली. या वेळी कोणतीही व्यक्ती, कोणत्याही घोषणा देणार नाही, असे वारंवार बजावले जात होते. कबरीपर्यंत पोहोचण्यास खांदेकऱ्यांना तब्बल १५ मिनिटांहून अधिक वेळ लागला. अखेर सव्वापाच वाजण्याच्या सुमारास याकूबचे पार्थिव जनाज्यातून काढून कबरीमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत त्यावर अंत्यसंस्कार सुरू होते.
याकूबचा अखेरचा प्रवास...
By admin | Published: July 31, 2015 4:04 AM