लोकमत न्यूज नेटवर्कजेजुरी (पुणे) : विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरला निघालेला संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांचा पायी सोहळा महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीत पोहोचला आणि भंडाऱ्याची उधळण करीत ‘येळकोट, येळकोट जय मल्हार’ असा एकच जयघोष वारकऱ्यांनी केला. सकाळी श्री. संत सोपानकाकांच्या सासवड नगरीचा निरोप घेऊन सोहळ्याने कुलदैवत तीर्थक्षेत्र जेजुरीकडे प्रस्थान ठेवले. ढगांनी आच्छादलेले आभाळ, अधूनमधून होणारा ऊन सावलीचा खेळ, दिंडी दिंडीतून येणारे अभंग, भूपाळी, वासुदेव, गौळणी, आंधळे, पांगळे, गुरूपरंपरेचे अभंग, नाटाचे अभंग आदींचे सूर संपूर्ण वातावरणात चैतन्य आणि उत्साह निर्माण करीत होते. या उत्साही वातावरणात सोहळ्यातील वैष्णव झपझप पावले टाकीत खंडोबाची जेजुरी जवळ करीत होता. ‘ज्ञानोबा-माऊलीं’च्या गजरात सोहळा जेजुरीकडे येत असताना बोरवकेमळा येथील न्याहारी, पुढे शिवरी येथील दुपारची विश्रांती त्याचबरोबर साकुर्डे येथील विसावा उरकून सायंकाळी ५ वाजता मजल दर मजल करीत सोहळा जेजुरीत पोहोचला. जेजुरी नगरपालिका, मार्तंड देवसंस्थान यांच्यावतीने सदानंदाच्या जयघोषात माउलींच्या रथावर भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण करण्यात आली. वारकऱ्यांनीही टाळ-मृदंगाच्या गजरात येळकोट मांडला. या वेळी शहरात ठिकठिकाणी माऊलींचे स्वागत करण्यात येत होते. मार्तंड देवसंस्थानच्यावतीने ही प्रमुख विश्वस्त वसंत नाझीरकर, डॉ. प्रसाद खंडांगळे, दशरथ घोरपडे, संदीप घोणे, सुधीर गोडसे, माजी विश्वस्त राजेंद्र दरेकर यांनी भंडाऱ्याच्या उधळणीत माऊलीचे स्वागत केले.
वारकऱ्यांचा जेजुरीत येळकोट!
By admin | Published: June 23, 2017 2:04 AM