अमरावती: महाराष्ट्राच्या महिला व बाल विकासमंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar) आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे विधान केले आहे. "शरद पवार आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते, तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं," असे मोठे वक्तव्य ठाकूर यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
आज अमरावतीमध्ये शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची 57वी पुण्यतिथी पार पडली. यावेळी अमरावतीमधील छत्रपती शिवाजी महारज प्रेक्षागृहाचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत क्रीडामंत्री सुनिल केदार, खासदार नवनीत राणा उपस्थित होत्या. यावेळी बोलताना ठाकूर म्हणाल्या की, "शरद पवार साहेब चार वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, पण आज काळाची गरज आहे. पवारसाहेब आपल्या सोबत आहेत, आपल्याला मार्गदर्शन करतात. कोणीही कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र हा स्थिरच राहणार, हा अस्थिर होणार नाही."
तुम्ही आमच्यासोबत, हे आमचे भाग्य...त्या पुढे म्हणाल्या, ''काल शरद पवार यांच्या घरावर इतका मोठा हल्ला झाला, प्रत्येकजण मला विचारत होते की साहेब येणार आहेत का? पण साहेब तुम्ही आलात, तुमच्या हिमतीची दादच दिली पाहिजे. आमच्यापेक्षा चारपट वयाचे तुम्ही आहात, पण तुम्ही थकत कसे नाहीत. प्रत्येक गोष्ट तुमच्याकडून शिकण्यासारखी आहे. जसे भाऊसाहेब झटत होते, त्याच प्रकारे तुम्ही आज आमच्या समवेत उपस्थित आहात, हे आमचे भाग्य आहे.''