ठाणे - यशवंतराव चव्हाण ग्रंथ निर्मिती व अनुवाद मंडळाची स्थापना महाराष्ट्र शासन करत आहे. हे मंडळ आजपासूनच अस्तित्वात आले आहे, अशी घोषणा मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात सोमवारी केली.
या मंडळाच्या अध्यक्षपदी रंगनाथ पठारे यांची तर सदस्य म्हणून सदानंद मोरे यांच्या नावाचीही घोषणा मंत्री सामंत यांनी यावेळी केली. या मंडळासाठी आवश्यक निधीची तरतूद त्वरित केली जाईल असेही ते म्हणाले. ठाण्यामध्ये लोकमतच्या वतीने आयोजित साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून मंत्री सामंत बोलत होते. या सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक प्रा. रंगनाथ पठारे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना पठारे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात असलेल्या विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळाच्या कार्याची आठवण करून दिली. त्याकाळी या मंडळाच्या माध्यमातून विविध ज्ञानशाखांमधील साहित्य अनुवादित केले जात असे. त्याचा उपयोग मराठी भाषेच्या समृद्धीसाठी झाला. सध्याच्या काळातही या मंडळाची आवश्यकता असून विविध भाषांमधील ज्ञान मराठीत येत राहण्याची व्यवस्था निर्माण केली पाहिजे. त्यासाठी हे मंडळ पुनरुज्जीवीत करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पठारे यांनी केले. पठारे यांच्या या मागणीचा धागा पकडत मंत्री सामंत यांनी हे मंडळ आजपासूनच अस्तित्वात आले असे ही घोषित केले.
शंतनू नायडू वाचन संस्कृतीचे ब्रॅंड ॲम्बेसेडरटाटा मोटर्सचे महाव्यवस्थापक शंतनू नायडू हे मराठी वाचन संस्कृतीचे ब्रँड अँबेसिडर असतील असे सांगत मंत्री सामंत यांनी यावर्षीची लोकमत साहित्य पुरस्कार विजेती सगळी पुस्तके महाराष्ट्रातल्या १२,५०० ग्रंथालयांसाठी घेतली जातील, अशी ही घोषणा केली, त्यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांच्या घोषणेचे स्वागत केले.
काश्मीरमध्ये मराठी अध्यासन केंद्रकाश्मीरमधील विद्यापीठात मराठी अध्यासन केंद्र सुरू केले जात असल्याची माहितीही मंत्री सामंत यांनी यावेळी दिली. परराज्यात मराठी भाषेचे अशाप्रकारे केंद्र सुरू होण्याची महाराष्ट्रसाठी ही अभिमानास्पद बाब असल्याचे ते म्हणाले.