Sharad Pawar News: एकीकडे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरून राजकीय वातावरण तापल्याचे मिळत आहेत. तर हळूहळू सर्व पक्षांना २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांचे वेध लागण्यास सुरुवात झाली आहे. भाजपविरोधातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या दृष्टिने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यातच आता २०२४ मध्ये शरद पवारपंतप्रधान होऊ शकतात, असे भाकित एका ज्येष्ठ नेत्याने केले आहे.
ज्येष्ठ नेते नेते यशवंतराव गडाख यांनी यासंदर्भातील दावा केला आहे. मीडियाशी बोलताना ते म्हणाले की, काय सांगावे कदाचित २०२४ नंतर परिस्थिती बदलली तर शरद पवार पंतप्रधानही होतील. शरद पवार यांची एकंदर कारकीर्द संघर्षाची आहे. त्यांच्याकडे एक वेगळी ऊर्जा आहे. जनता हीच त्यांची ऊर्जा आहे. वैयक्तिक प्रश्न, तब्येतीचे प्रश्न आले, पण त्यांनी त्यावर मात केली. याही वयात ते लोकांमध्ये जातात. लोकांमध्ये फिरत आहेत, ही हिंमत या वयातही या माणसात आहे. दिल्लीत आजही त्यांचे वजन आहे, असे यशवंतराव गडाख यांनी म्हटले आहे.
दिल्लीतील चौकडीमुळे शरद पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत
शरद पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत, कारण दिल्लीतील काँग्रेसमधील चौकडी आहे. दिल्लीतून त्यांचे नाव कापण्यात यायचे. नरसिंह राव आणि शरद पवार यांच्यात पक्षांतर्गत निवडणूक झाली यात माझे मत पवारांना दिले होते. मात्र दिल्लीतील चौकडीमुळे शरद पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत, असे यशवंतराव गडाख यांनी म्हटले आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांची आणि माझी मैत्री होती.
सर्वसामान्य लोक उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत
असे प्रसंग आणि संकट आयुष्यात अनेकवेळा येतात. माझ्यावरही अनेक प्रसंग आले. पण मी धीराने तोंड दिले. उद्धव ठाकरे सुद्धा धीराने तोंड देत आहेत. लाखांच्या सभा होत आहेत. त्यातून त्यांचा आत्मविश्वास दिसून येतो, सर्वसामान्य लोक उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत हे दिसून येत आहे, असे गडाख यांनी नमूद केले. तसेच उद्धव ठाकरे हे १०० टक्के राजकारणी नाहीत. गद्दारांना तोंड देऊ शकत नाही म्हणून राजीनामा दिला असे ते म्हणाले. मात्र महाराष्ट्रातील जनता याला उत्तर देईल. २०२४ ला महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीला मतदान करेल. निवडणूक निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने लागेल, असा दावा गडाख यांनी केला.