नेवासा (अहमदनगर) : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व शरद पवार यांचे कट्टर समर्थक यशवंतराव गडाख व त्यांचे पुत्र आणि माजी आमदार शंकरराव गडाख यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. गडाख पिता-पुत्र विकास आघाडीची स्थापना करणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गेल्या दोन वर्षांत तालुक्यातील संपूर्ण राजकीय परिस्थिती बदलली आहे. तालुका राष्ट्रवादीत अंतर्गत भांडणे आहेत. शंकररावांच्या निर्णयाचे जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होतील, असे यशवंतराव गडाख यांनी शुक्रवारी सोनई येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितले. अंधारात घात करण्याचे राजकारण करण्याची तालुक्यात जुनी खोड असल्याची त्यांनी आठवण करून दिली. विरोधकांच्या खोडीला जनतेसमोर जाऊन उत्तर देण्याचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.स्वपक्षाच्या लोकांकडूनच पाठीत खंजीर खुपसण्यात येत असल्याने व सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा यामध्ये नाहक बळी जाऊ लागल्याने राष्ट्रवादी सोडण्याचा कटू निर्णय घ्यावा लागल्याचे शंकरराव गडाख यांनी जाहीर केले. ते म्हणाले, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाकडून उमेदवारी करण्यासाठी आॅफर दिली होती. मात्र, ती नाकारली होती. (प्रतिनिधी)
यशवंतराव गडाखांनी सोडली पवारांची साथ
By admin | Published: January 28, 2017 1:06 AM