ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. 07 - ६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची शुक्रवारी ७ एप्रिल रोजी नवी दिल्ली येथे घोषणा करण्यात आली. यामध्ये ‘सर्वोत्तम शोध, साहस फिल्म कॅटेगरी’मध्ये यवतमाळच्या प्रांतिक विवेक देशमुख या युवकाने तयार केलेल्या ‘मातीतली कुस्ती’ या लघुपटाला ‘रजत कमल’ पुरस्कार घोषित झाला आहे. तसेच निर्माता व दिग्दर्शकाला प्रत्येकी ५० हजार रुपये रोख पारितोषिक जाहीर झाले आहे.
प्रांतिकने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संप्रेषण विभागात प्रकल्प म्हणून हा लघुपट केला. २३४ वर्षांची प्रचंड मोठी परंपरा असलेल्या पुण्याच्या चिंचेच्या तालमीची कथावस्तू म्हणून त्याने निवड केली. या तालमीत लाल मातीतली कुस्ती खेळणारे मल्ल जेमतेम २३ उरले आहेत. मॅटवरील कुस्तीमुळे या पारंपरिक कला क्रीडा प्रकाराकडे झालेले दुर्लक्ष, पहेलवानांची उपेक्षा प्रांतिकने आपल्या फिल्ममध्ये अतिशय ताकदीने मांडली.
फिल्म समारोह निदेशालयाने दिल्लीत राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करताना ‘मातीतली कुस्ती’ ही संपत चाललेल्या क्रीडा परंपरेवर प्रकाश टाकणारी महत्त्वाची फिल्म असल्याचे म्हटले. प्रांतिकचे वडील विवेक देशमुख हे येथील बाबाजी दाते महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक असून उत्तम संचालनकर्ते आहेत. आई प्रतिभा देशमुख या स्थानिक लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयात इंग्रजीच्या प्राध्यापक आहेत.
दोन पुरस्कार पटकावणारा एकमेव लघुपट
प्रांतिकच्या याच लघुपटाला प्रतिष्ठेचा ६२ वा फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाला आहे. अतिशय कमी वयात, यवतमाळसारख्या चित्रपटनिर्मितीचे फारसे वातावरण नसणाºया गावातील युवकाला सलग दोन प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, एकाच वर्षात फिल्मफेअर व राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावणारा ‘मातीतली कुस्ती’ हा एकमेव लघुपट आहे. मातीतल्या कुस्तीगिरांचे वास्तव प्रांतिकने दमदारपणे मांडले आहे. पुरस्कारांमुळे अशा प्रकारच्या कला-क्रीडा प्रकाराकडे देशाचे लक्ष वेधले गेले तर आपल्या परिश्रमाला खरी पावती मिळाल्यासारखे होईल, असे प्रांतिकने यवतमाळ येथे पत्रकार परिषदेत सांगितले.