यवतमाळ : शेतक-यांचा सातबारा कोरा करा या मागणीसाठी एका शेतक-याने झाडावर चढून रविवारी सकाळी ९ वाजतापासून यवतमाळ तालुक्यातील अर्जुना येथे आंदोलन सुरू केले आहे. त्याच्या सोबत विषाची बॉटल असून त्याच्या समर्थकांनी यवतमाळ-आर्णी मार्गावर वाहतूक रोखून धरली. प्रशासनाने त्याला खाली उतरविण्याचे प्रयत्न चालविले असले तरी तो आपल्या आंदोलनावर ठाम आहे.
धनंजय राजेंद्र वानखेडे (३८) असे आंदोलनकर्त्या शेतक-याचे नाव आहे. तो दारव्हा तालुक्यातील शेंद्री डोल्हारी येथील रहिवासी आहे. यावर्षी त्याने अर्जुना येथे मक्त्याने शेत घेतले आहे. रविवारी सकाळी तो पत्नी आणि काही महिलांसह शेतात पोहोचला. सोबत विषाची बॉटल होती. काही वेळात तो एका झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसला. त्याचवेळी त्याच्या सोबतच्या महिलांनी यवतमाळ-आर्णी मार्गावरील वाहतूक रोखून धरली. तत्पूर्वी त्याने झाडाला आमरण उपोषण असे फलक झाडाला बांधले होते.
आपल्या मागण्यांची चिठ्ठी त्याने झाडावरून खाली फेकली. त्यात सर्व शेतक-यांना दिवाळीपूर्वी दहा हजार रुपये द्या, शेतक-यांचा सातबारा कोरा करा, असे लिहिलेले आहेत. या घटनेची माहिती दिनेश जयस्वाल यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिसांना दिली. ठाणेदार संजय डहाके आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. काही वेळात नायब तहसीलदार नरेंद्र थुटे, मंडळ अधिकारी गुल्हाने त्या ठिकाणी आले. रुग्णवाहिका, अग्नीशमन दलालाही पाचारण करण्यात आले. धनंजयला खाली उतरविण्याचे प्रयत्न सुरू झाले. परंतु तो कुणाचेही ऐकायच्या मन:स्थितीत दिसत नाही. कुणी वर चढल्यास मी झाडावरुन उडी मारील, असे तो सांगत आहे. तसेच त्याच्यासोबत विषाची बॉटल असल्यानेही प्रशासन हादरुन गेले आहे.
विशेष म्हणजे धनंजयने गतवर्षी यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात खासगी फायनान्स कंपनीविरोधात आंदोलन करीत विषप्राशन केले होते. तर यापूर्वी एका मोबाईल टॉवरवर चढूनही आंदोलन केले होते. वृत्तलिहिस्तोवर तो झाडावरच चढून आहे. या ठिकाणी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली असून नागरिकही त्याला खाली येण्यासाठी विनवणी करीत आहे.