यवतमाळ : तीव्र पाणीटंचाईमुळे उपसलेल्या विहिरीत शेकडो आधार कार्ड आढळल्याची घटना यवतमाळच्या शिंदेनगर स्थित साई मंदिर परिसरात रविवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. सदर आधार कार्ड लोहारा परिसरातील आहे.यवतमाळ शहरात गत काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरातील विहिरींचे खोलीकरण आणि स्वच्छता मोहीम सुरू आहे. साई मंदिर परिसरातील या विहिरीची लोकसहभागातून रविवारी सकाळी साफसफाई सुरू होती. काही तरुण विहिरी उतरून गाळ उपसत होते. त्यावेळी प्लास्टिकची मोठी पिशवी दगडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. ती वर आणून उघडली असता त्यात शेकडो आधार कार्ड आढळून आले. हा प्रकार पाहून तेथे उपस्थितांना धक्काच बसला. परिसरातील नागरिकांनी तेथे धाव घेतली. आधार कार्ड बघितले असता सर्व आधार कार्ड यवतमाळच्या लोहारा परिसरातील असल्याचे दिसत होते. इतके दिवस पाण्यात असूनही आधार कार्ड सुस्थितीत आहे. नेमके हे आधार कार्ड विहिरीत कुणी आणि कशासाठी टाकले हे मात्र कळू शकले नाही. याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आली.
यवतमाळ : विहिरीत सापडले शेकडो आधार कार्ड, विहीर उपसताना उलगडले रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 12:41 PM