- रवींद्र चांदेकर, यवतमाळ
जिल्ह्यात सुमारे ११ हजार बालके कुपोषणाच्या विळख्यात सापडली आहे. त्यापैकी १ हजार २३७ बालके तीव्र कुपोषित आहेत. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांवरच यानिमित्ताने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जिल्ह्यात ० ते ५ वर्षाआतील एक लाख ८५ हजार ५९७ बालकांचा सर्व्हे करण्यात आला. त्यातील ९३.८४ टक्के अर्थात एक लाख ६९ हजार ७०२ बालके सर्वसाधारण श्रेणीत असल्याचे आढळून आले. नऊ हजार ९१० बालके मध्यम तीव्र कुपोषित म्हणून नोंद करण्यात आली. उर्वरित एक हजार २३७ बालके अतितीव्र कुपोषित म्हणून गणली गेली आहेत.यवतमाळ तालुक्यात सर्वाधिक १८० बालके अतितीव्र कुपोषित आहे. शासनातर्फे अंगणवाडीमार्फत विविध योजना राबविल्या जातात. त्यात पोषक आहाराचा समावेश आहे. जिल्ह्यात राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन योजनाही राबविली जाते. तरीही मोठ्या प्रमाणात बालके कुपोषित असल्याने या योजनांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.