ऑनलाइन लोकमत/रूपेश उत्तरवार
यवतमाळ, दि.15 - पाचशे व हजाराच्या नोटा बदलविण्यासाठी, पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या बँका व एटीएमसमोरील रांगा कायम आहेत. त्यातूनच एका संतप्त ग्राहकाने मंगळवारी येथील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममध्ये तोडफोड केली. या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
यवतमाळातील दारव्हा मार्गावर एका हॉटेलनजीक पंजाब नॅशनल बँकेची नवी शाखा सुरू झाली. त्याच्या बाजूलाच एटीएम उभारण्यात आले आहे. या एटीएमसमोर ८ नोव्हेंबरच्या रात्रीपासून दररोज ४०० ते ५०० ग्राहकांची गर्दी असते. मंगळवारी दुपारीसुद्धा मोठी रांग होती. या रांगेतीलच एका युवकाने आपला नंबर केव्हा लागणार असे म्हणत एटीएमच्या दाराला जोरदार लाथ मारुन काचांची तोडफोड केली. त्याच क्षणी तेथील सायरन वाजल्याने हा ग्राहक पळून गेला. पंजाब नॅशनल बँकेचे शाखा व्यवस्थापक राम खांब यांनी समोरच असलेल्या यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याला या तोडफोडीची सूचना दिली. मात्र एटीएमची तोडफोड झालेले घटनास्थळ आपल्या हद्दीत येत नसल्याचे सांगून त्यांनी कारवाईस असमर्थता दर्शविली. सायंकाळी ६.३० पर्यंतसुद्धा पोलीस तेथे पोहोचले नव्हते. शिवाय तोडफोडीमुळे संपूर्ण एटीएममध्ये काचा विखुरलेल्या होत्या.
व्यवस्थापक राम खांब यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, या तोडफोडीमुळे २० हजारांचे नुकसान झाले आहे. एटीएममधील तोडफोडीनंतर आपण लोकांना पैसे काढणे थांबविण्याची विनंती केली. मात्र लोक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. घटनेवरून चार तास लोटूनही पोलीस न आल्याने एटीएममधील रोकड असुरक्षित झाल्याचे त्यांनी सांगितले. किमान गर्दी ओसरेपर्यंत दोन पोलिसांची सुरक्षा पुरवावी, अशी आपली मागणी आहे. ही सुरक्षा न पुरविली गेल्यास एटीएम चालविणे कठीण जाईल, त्यात रक्कम कशी टाकावी हा प्रश्न निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पाचशे व हजाराच्या नोटा बंदीमुळे नागरिकांना दैनंदिन व्यवहार करणेही कठीण झाले आहे. तासन्तास बँका व एटीएमसमोर रांगा लावूनही पैसे मिळत नसल्याने नागरिक वैतागले आहे. त्यातूनच पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएमची तोडफोड झाली. या घटनेची पुनरावृत्ती जिल्ह्यातील अन्य एटीएम व बँकांमध्ये होण्याची भीती बँकींग क्षेत्रातील यंत्रणेकडून व्यक्त केली जात आहे. मंगळवारी अनेक बँकांची लिंक फेल असल्याने नागरिकांना सकाळी ११ पासून सायंकाळी ५ पर्यंत रांगेत राहूनही हाती पैसे मिळाले नाही. त्यामुळे नागरिकांत प्रचंड रोष पहायला मिळत होता.