यवतमाळ - Bhawana Gawli on Yavatmal Wasim ( Marathi News ) मी नाराज होणाऱ्यांपैकी नाही. परंतु उमेदवारी न मिळाल्यानं मला खंत वाटली. खंत वाटल्याने मी बाहेर पडली नाही. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. त्यांनी ज्याप्रकारे राज्यात काम केले आहे. पोटतिडकीने ते रात्रंदिवस काम करतायेत. त्यात अबकी बार ४०० पार या यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेला साद देत मी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचाराचं काम करणार आहे असं विधान यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी केले आहे. त्यामुळे भावना गवळी यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आल्याचं दिसून येते.
भावना गवळी म्हणाल्या की, मित्रपक्ष आणि घटक पक्षासोबत आमची आजपासून बैठक, मेळावे सुरू होतील. राजश्री पाटील यांना विजयी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मी २५ वर्षापासून काम करते, शिवसेना जिल्हाप्रमुख, खासदार म्हणून काम केलेय. माझे वडील शिवसेनेत होते. लहानपणापासून बाळकडू मिळाले आहे. मला काय भेटतंय यासाठी मी काम करत नाही. माझे लक्ष पदावर नव्हते. जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आहे त्याला तडा जाणार नाही यासाठी मी काम करत आहे. माझ्यासाठी शिवसेना पक्ष महत्त्वाचा आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत चर्चा चांगली झाली. पुढच्या काळात कसा प्रचार करायचा, कशा जबाबदाऱ्या घ्यायच्या त्यावर चर्चा झालीय. राजश्री पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. ज्यारितीने माझा प्रचार मी करत होते, तसेच महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जे काही झाले ते भूतकाळ आहे. माझ्यासाठी शिवसेना पक्ष महत्त्वाचा असून मी कधी प्रसिद्धीच्या भानगडीत पडले नाही. सातत्याने माझ्या मताधिक्यात वाढ होत आलीय. पक्षासाठी मी बांधील आहे असं भावना गवळी यांनी सांगितले.
दरम्यान, मी संघर्षातून पुढे आलीय, त्यामुळे नाराज होत नाही. आपण कुठे कमी पडलो याचे आत्मचिंतन करणारी मी आहे. त्याचसोबत मी लढणार आहे आणि महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी लढणार आहे. २५ वर्ष मी कुटुंब म्हणून मतदारसंघात काम केले आहे. जुने ऋणानुबंध जुळले जातात. त्यामुळे मतदारांमध्ये काहीसी नाराजी वाटणे साहजिकच आहे. परंतु महायुतीच्या उमेदवाराला विजयी करणे यासाठी आम्ही कामाला लागलोय. माझ्या आयुष्यात नेहमी चढउतार पाहिले आहे असं भावना गवळी यांनी म्हटलं.