यवतमाळ : निवडणुकांचे वर्ष म्हणून अख्ख्या देशाचे लक्ष २०१९ कडे लागलेले असताना साहित्यिकांनी मात्र याच वर्षात होणा-या संमेलनात चक्क निवडणुकीलाच फाटा दिला. दरवर्षी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडताना होणारी निवडणूक, त्यातील पातळी सोडणारे वाद टाळून यंदा संमेलनाध्यक्ष एकमताने निवडण्यात आला. मराठी साहित्य विश्वासाठी क्रांतिकारक ठरलेल्या या नव्या पायंड्याची सुरवात रविवारी यवतमाळात झाली, हे विशेष.तब्बल ४६ वर्षांनंतर यवतमाळात ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातले आहे. याच संमेलनाच्या निमित्ताने साहित्य महामंडळाने तीन क्रांतीकारक बदल आपल्या घटनेत करवून घेतले. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे, संमेलनाध्यक्षांची निवडणूक बाद केली. त्याऐवजी घटक संस्थांनी सूचविलेल्या नावांतून एका साहित्यिकाला अध्यक्षपदाचा बहुमान सन्मानानेच बहाल करायचा. तसा तो रविवारी डॉ. अरुणा ढेरे यांना बहाल करण्यात आला. त्यासाठी महामंडळाचे महाराष्ट्रभरातील पदाधिकारी यवतमाळच्या डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्रात जमले होते. याच संमेलनाच्या निमित्ताने महामंडळाने आपला परिघ अधिक विस्तारला आहे. आतापर्यंत साहित्य महामंडळासोबत केवळ घटक संस्था, समाविष्ट संस्था आणि संलग्न संस्थाच काम करू शकत होत्या. मात्र आता महामंडळाने आपल्या घटनेत बदल करून ‘सहयोगी संस्था’ हा नवा प्रकार सामील केला आहे. समाजात विविध समूहांचे विविध विचार प्रवाह आहेत. त्यांच्या-त्यांच्या सातित्यिक संस्थाही आहेत. या संस्थांना अखिल भारतीय साहित्य महामंडळासोबत काम करता येणार आहे. मात्र त्यासाठी घटक संस्थेची नाहरकत असावी आणि २५ वर्षांपासून ती संस्था नोंदणीकृत असावी. महामंडळाने केलेला तिसरा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे, संमेलनाशिवाय वार्षिक अधिवेशनही घेतले जाणार आहे. अगदी प्रारंभीच्या साहित्य संमेलनांना अधिवेशनाचेच स्वरूप होते. मात्र, काळ बदलत गेला, तशी संमेलनेही दिमाखदार सोहळ्यात रूपांतरित झाली. परंतु यवतमाळच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा अधिवेशने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही साहित्यविश्वासाठी मोठी देणच. यवतमाळच्या पोस्टल ग्राउंडवर (समता मैदान) ११, १२, १३ जानेवारीला होणा-या साहित्य संमेलनाचा मुख्य केंद्र शेतकरी राहणार आहे. पहिलाच परिसंवाद शेतीविषयी होतोय. ‘कृषक समाजाच्या चित्रणाबाबत नागरी लेखक उदासीन का?’ असा विषय घेऊन शहरी साहित्यिकांनाच जाब विचारला जाणार आहे. त्याचवेळी ‘तत्वशील समाजघडणीसाठी आज महानुभाव, वारकरी, बसवेश्वर विचारांची गरज’ या परिसंवादात सर्वसमावेशक क्रांतीकारी विचारांचीच मांडणी होण्याची शक्यता आहे. तर तिस-या परिसंवादात ‘माध्यमांची स्वायत्तता नेमकी कोणाची?’ हा प्रश्न उपस्थित केला जाणार आहे. तांड्यांच्या, पोडांच्या व्यथा मांडणारअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात फारसे कधी चर्चेत न आलेले तांडे, पोड यवतमाळच्या संमेलनात लक्षवेधी ठरणार आहेत. बंजारा तांडे, कोलाम पोड यांचे जगणे, त्यातील अडचणी, तेथील वैशिष्ट्ये यावर विशेष चर्चा झडणार आहे. ‘कथा आणि व्यथा तांड्यांच्या पोडांच्या’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे जनजीवन पहिल्यांदाच सारस्वतांच्या नोंदवहीत नोंदविले जाणार आहे. तर परिसरातील वºहाडी बोलीचा सन्मान करण्यासाठी खास व-हाडी कविसंमेलनही होणार आहे.
पूर्वी संमेलनाध्यक्षांच्या निवडणुकीत ११०० लोक मत देत होते. त्यातून जिंकणा-या किंवा हरणा-या उमेदवाराचे श्रेय किंवा दोष साहित्य संस्थांवर येत नव्हते. तर तो-तो उमेदवारच विजय किंवा पराजयासाठी जबाबदार ठरत होता. आताही निवडणूकच झाली. पण मत देणारे लोक मर्यादित होते. या निवडीत ज्या मोठ मोठ्या साहित्यिकांना शून्य मत मिळाले, त्याची जबाबदारी त्यांचे नाव सूचविणाºया संस्थांवर येते.- कौतिकराव ठाले पाटील, साहित्य महामंडळाचे सदस्य
यवतमाळात संमेलन होत असल्याने अतिशय आनंद झाला. हे संमेलन अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडेल याविषयी विश्वास आहे. अरुणातार्इंच्या नावावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले. त्यासंदर्भात महामंडळाच्या प्रमुखांनी दिलेली माहितीच अंतिम मानावी.- आसाराम लोमटे, साहित्य महामंडळाचे सदस्य
यवतमाळला साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान दिल्याबद्दल साहित्य महामंडळाच्या सर्व पदाधिकाºयांचे आभार मानतो. यवतमाळचे हे संमेलन निश्चितच मराठीचे महत्त्व सातासमुद्रा पार पोहोचवेल. संमेलन भव्य दिव्यच होईल. पण भव्यता केवळ मोठ्या इमारतीत, मंडपात नसते. तर साहित्यिकांच्या शब्दातील भव्यता लक्षात घ्यावी. तशीच भव्यता या संमेलनात दिसेल.- मदन येरावार, स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री