जळगाव/यावल : अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात विशाल उर्फ सुखदेव भगवान सूर्यवंशी (२२, रा साकळी ता. यावल) या तरुणाला गुरुवारी दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले. या हत्येत वापरण्यात आलेले वाहन साकळी येथील असल्याचा संशय आहे. विशाल याचे दुचाकी दुरूस्तीचे गॅरेज आहे.
पुणे येथे २०१३ मध्ये दाभोलकरांची हत्या झाली होती. काही दिवसांपूर्वी दाभोलकरांचा मारेकरी म्हणून संशयित सचिन अंदुरेला औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आले आहे. अंदुरेच्या मेहुण्यांकडून पिस्तुलासह तलवार, कुकरी, चाकू, एअरगन जप्त करण्यात आली. या पिस्तुलानेच दाभोलकरांसह गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे.
गेल्या महिन्यात गौरी लंकेश हत्या प्रकरणात महाराष्ट्र व कर्नाटक एसआयटीचे पथक जळगावात आले होते. त्यांनी जळगावातील एका नगरसेवकाच्या नातेवाईकाच्या घराची झडती घेतली होती. त्यानंतर आता दाभोलकर हत्या प्रकरणात एटीएसचे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे.
तीन दिवस साकळीत रेकीमिळालेल्या माहितीनुसार एटीएसचे हे पथक सोलापूर येथून आलेले आहे. त्यांनी तीन दिवस साकळी गावात रेकी केली. संशयित विशाल याच्या हालचालींवर लक्ष ठेवले. इतकेच काय त्याच्या गॅरेजवर या पथकाने वाहनही दुरुस्त केले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विशाल याला दुपारी साडे तीन वाजता पथकाने ताब्यात घेतले. त्याला नाशिक येथे नेण्यात आलेले आहे. या पथकातील काही सदस्य अजूनही जिल्ह्यात ठाण मांडून आहेत.