मुंबई : दहिसर येथील सेंट फ्रान्सिस इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील हेत शहा या विद्यार्थ्याने, यंदाचा ‘महा आय टी आयडॉल’ हा किताब पटकाविला आहे. द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे अहमदनगर येथील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील आशिष ढासे, तर पुण्यातील मराठवाडा मित्रमंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयातील कौस्तुभ देवकर यांना मिळाला.माहिती व तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील प्रशिक्षण सेवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या ‘सीड इन्फोटेक’ या संस्थेतर्फे, गेल्या आठ वर्षांपासून दरवर्षी राज्यस्तरावर ‘सीड आयटी आयडॉल’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये अभियांत्रिकी व इतर शाखेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात भाग घेतात. विद्यार्थ्यांमधील सी प्रोग्रामिंग आणि संगणकाचे मूलभूत ज्ञान चाचपून, त्यांना आयटी क्षेत्रात येण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्याची जाणीव करून देणे व त्याचबरोबर, भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांसाठी त्यांना तयार करणे हा या स्पर्धेमागील प्रमुख उद्देश आहे. हा उपक्रम राज्यातील विविध विद्यापीठांच्या मान्यतेने राबविण्यात येतो. ज्यामध्ये प्रामुख्याने मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ (नागपूर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (औरंगाबाद), शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर), सोलापूर विद्यापीठ यांचा समावेश आहे. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून आठ विद्यापीठांशी संलग्न ३३६ महाविद्यालये या उपक्रमात सहभागी झाली होती व त्याद्वारे ७३ हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. यंदाच्या वर्षी ‘सीड महा आयटी आयडॉल’ ही स्पर्धा पुण्यातील हॉटेल शेरेटन ग्रँड येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे सलग आठवे वर्ष असून, पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘सीड महा आयटी आयडॉल २०१७’ मध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक विभागातील अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या सर्व १० स्पर्धकांना ‘सीड महा आयटी आयडॉल’ स्पर्धेसाठी पुण्यात बोलाविण्यात आले होते. स्पर्धेत विजयी ठरलेल्या मुंबईच्या हेत शहा याला ‘आय फोन - 7’ देऊन पुणेरी पगडीने सन्मानित आले. द्वितीय क्रमांकाच्या आशिष ढासे याला +1 3टी हा स्मार्ट फोन प्रदान करण्यात आला, तर तृतीय क्रमांकाच्या कौस्तुभ देवकर याला वेस्टर्न डिजिटलचा माय क्लाउड देऊन गौरविण्यात करण्यात आले. ‘सीड इन्फोटेक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र बऱ्हाटे आणि कार्यकारी संचालिका भारती बऱ्हाटे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. (प्रतिनिधी)
हेत शहा ठरला २०१७ चा ‘महा आयटी आयडॉल’
By admin | Published: April 03, 2017 3:05 AM