राजरत्न सिरसाट / अकोला: पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने जिल्हय़ातील शेतकर्यांचे हरित स्वप्न करपू लागली असून, तापमानात वाढ झाल्याने ३ लाख हेक्टरवरील पिके कोमेजू लागली आहेत. पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट समोर दिसत असल्याने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जिल्हय़ात तीन लाख हेक्टरच्यावर क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. पण सलग २५ दिवसांपासून पावसाने दडी मारली असून, तापमान वाढल्याने पिके कोमेजली आहेत. त्यामुळे शेतकर्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने पश्चिम विदर्भातील शेतकर्यांचे हरित स्वप्न करपू लागली असून, माना टाकणार्या पिकांना जगविण्यासाठी शेतकर्यांना लोट्याने पाणी देण्याची वेळ आली आहे. सलग तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारली असून, तापमान वाढल्याने पिके कोमेजू लागली आहेत. जिल्ह्यातील खरीप पिकाचे क्षेत्रफळ ४ लाख ८३ हजार ८८0 हेक्टर असून, आतापर्यंत ३ लाख हेक्टरच्यावर पेरणी झाली आहे. यावर्षी शेतकर्यांनी सोयाबीन पेरणीवर भर दिला आहे. या पिकाला पाण्याची भरपूर व नितांत गरज असते. जून महिन्यात आलेल्या पावसामुळे शेतकर्यांनी पेरणी केली; पण त्यानंतर २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकर्यांचे तोंडचे पाणी पळाले असून, शेतकरी सैरभैर झाला आहे. २0 जूननंतर ज्यांनी पेरणी केली, त्यातील अर्धे बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकरी अगोदरच प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यामुळे पीक जगले पाहिजे म्हणून शेतकरी लोट्याने पाणी देऊन पिके जगविण्याचे प्रयत्न करीत आहेत.
पावसाची नितांत गरज
येत्या दोन दिवसांत पाऊस न आल्यास उर्वरित पिके जळण्याची शक्यता आहे. प्रखर तापमानामुळे जमिनीला भेगा पडल्याने पिकांना जमिनीतील ओलाव्याचा आधार संपला आहे. त्यामुळे आता पाणीच हवे आहे.
कापूस, सोयाबीन उत्पादनावर होणार परिणाम
यंदा वेळेवर झालेला पाऊस आणि पेरणीनंतर पडलेला पावसाचा ताण, याचा पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला असून, कापसाचे उत्पादन २५ ते ३0 टक्के घटण्याची शक्यता कृषीतज्ज्ञांनी वर्तविली आहे.
पिकांची वाढ खुंटली
जून महिन्यातील पावसाच्या भरवशावर अनेकांनी पेरणी केली, पण त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली असून, त्यांनी माना टाकल्या आहेत. ज्यांच्याकडे संरक्षित सिंचनाची सोय आहे, त्यांना पाण्याचा काटेकोर वापर करावा लागत आहे. ज्यांच्याकडे कोणतीच सोय नाही, त्यांना पिके जगविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
कीटकनाशकांचा खर्च वाढतोय!
पावसाच्या दीर्घ उघाडीमुळे सोयाबीन, कापूस पिकावर कीड, रोगराई वाढत असून, शेतकर्यांना कीटकनाशके, खताचा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्यांवर आर्थिक बोजा वाढत असून, शेतकर्यांना विविध ठिकाणाहून कर्ज काढावे लागत आहे.