नागपूर, दि. 10 - बहुप्रतिक्षित 91 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा विदर्भात होणार आहे. हिवरा आश्रमाला या वर्षीचा यजमानपदाचा मान मिळाला आहे. त्यामुळे विदर्भाच्या प्रवेशद्वारावर सारस्वतांचा मेळा भरणार आहे. यजमानपदाबाबत एकमत नसल्याने आज मतदान झाले यामध्ये 5 विरुद्ध 1 मताने हिवरा आश्रमवर शिक्का मोर्तब करण्यात आले.
९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनस्थळाची अधिकृत घोषणा रविवारी नागपुरात झाली. मराठवाडा, खान्देश आणि विदर्भाला जोडणारा सेतू म्हणून ज्याची ओळख आहे त्या बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रमला या संमेलनाचे यजमानपद मिळाले आहे. महामंडळाच्या नागपुरातील कार्यालयात रविवारी एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात संमेलनस्थळ पाहणी समितीने आपला अहवाल सादर केला. दिल्लीतील आयोजक संस्थेने ऐनवेळी माघार घेतल्याने बडोदा व हिवरा आश्रम हे दोनच पर्याय महामंडळापुढे उरले होते. परंतु, यातील एकाही स्थळावर एकमत होत नसल्याने अखेर मतदान घेण्यात आले. या मतदानात एक विरुद्ध पाच अशा फरकाने हिवरा आश्रमला पसंती मिळाली. रविवारच्या अंकात ‘लोकमत’ने हिवरा आश्रमला यजमानपद मिळणार, असे भाकित वर्तविले होते. ते खरे ठरले. - म्हणून हिवरा आश्रमचा दावा ठरला प्रबळराजमाता जिजाऊ, संत चोखामेळा, कविवर्य ना. घ. देशपांडे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर व हिवरा आश्रमची खरी ओळख असलेले संत शुकदास महाराज अशी प्रबोधनाच्या चळवळीची मोठी परंपरा या जिल्ह्याला लाभली आहे. परंतु अद्याप संमेलनाच्या यजमानपदाचा मान या जिल्ह्याला मिळालेला नाही, शिवाय संमेलनाची आयोजक संस्था स्वत: विवेकानंद आश्रम आहे. भव्य कार्यक्रमाच्या आयोजनाचा प्रदीर्घ अनुभव या संस्थेच्या पाठीशी आहे. दोन हजार साहित्यिकांसह साहित्य रसिकांच्या निवास व भोजनाची व्यवस्था व दोन हजार स्वयंसेवकांची शिस्तबद्ध फळीदेखील या आश्रमात आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन हे संमेलन हिवरा आश्रमला दिले जाईल, अशी शक्यता होती.