मुंबई : दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक सुखद वार्ता आहे. गेली तीन वर्षे मान्सूनला अडसर ठरलेल्या अल निनोचा प्रभाव ओसरत असल्याने यंदा चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. वातावरणातील बदलांचे स्वरूप पाहता यंदा ३ ते १० जून या कालावधीत मान्सून मुंबईत दाखल होईल, यावरही भारतीय हवामान खात्याने शिक्कामोर्तब केले आहे. यंदा २६ ते २७ मेदरम्यान केरळात मान्सून दाखल होण्याची शक्यता असून, २८ आणि २९ मेदरम्यान तो कोकणात येईल, असा अंदाज आहे. आजघडीला मुंबईसह राज्यात तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मागील तीन वर्षांपासून सातत्याने तापमानात वाढ होत आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये तापमानात सरासरी १.५ अंशानी वाढ झाली आहे. तापमानवाढीची परिस्थिती अशीच कायम राहिल्यास मेच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनचे राज्यात आगमन होण्याची शक्यता आहे. तर समुद्री वातावरणातील बदल आणि तापमानवाढीमुळे फारतर १० जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)१० जूनपर्यंत मान्सून मुंबईत मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या संचालक शुभांगी भुते यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, हवामानाचा सरासरी अंदाज पाहिला तर १० जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होण्याची अपेक्षा आहे. केरळात मान्सूनचे आगमन झाल्यानंतरच मुंबई व राज्यात तो कधी सक्रिय होणार याबाबत ठामपणे सांगता येते. त्यामुळे मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर मुंबईतील आगमनाची तारीख हवामान खात्याकडून जाहीर केली जाईल. ७२ तासांत पावसाचा इशारामुंबईसह राज्यातील तापमानाचा पारा चढाच आहे. मुंबईच्या कमाल तापमानाने बुधवारी ३८ अंशापर्यंत मजल मारली असून, राज्यातील प्रमुख शहरांचेही कमाल तापमान ४० अंशाच्या आसपास नोंदवण्यात येत आहेत. येत्या ७२ तासांत उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तर ४८ तासांत मुंबई आणि आसपासच्या परिसरात पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.मुंबईसाठी अंदाज२६ मार्च : आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, २३ अंशाच्या आसपास राहील.२७ मार्च : हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, २४ अंशाच्या आसपास राहील.
यंदा महाराष्ट्रात चांगला पाऊस !
By admin | Published: March 26, 2016 3:44 AM