पुणे : दमदार पावसामुळे यंदा भूगर्भाची तहान भागल्याने पाणी पातळीत वाढ झाली असून टंचाईची तीव्रता अत्यंत कमी जाणवेल, असे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालावरुन स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षीच्या सोळा हजार गावांच्या तुलनेत यंदा ३ हजार ४९६ गावांत टंचाईची स्थिती असून त्यातील ६०० गावांमध्येच टंचाईची तीव्रता एप्रिलमध्ये अधिक जाणवेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या वर्षी निम्म्या महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या होत्या. भूजल विभागाने राज्यातील ३ हजार ९२० विहिरींच्या पाहणीवरुन निरीक्षण नोंदविले आहे. ३५३ तालुक्यांपैकी १६६ तालुक्यांतील ३ हजार ४९६ गावांतील पातळीत १ मीटरपेक्षा अधिक घट झाली असून, त्यात १ ते २ मीटरने पाणी पातळीत घट झालेली २ हजार ५०९ गावे आहेत. तर, तीन मीटरपेक्षा पाणीपातळीत अधिक घट झालेली गावांची संख्या ३०६ इतकी आहे. पाणी पातळीत तीन मीटरपेक्षा अधिक घट झालेल्या गावांमध्ये टंचाईची झळ अधिक बसेल. त्या खालोखाल २ ते ३ मीटर घट असलेल्या गावांना पाण्याची कमतरता जाणवेल. धुळ््यात पाणी पातळीत घट धुळे जिल्ह्यात पाणी पातळीत सर्वाधिक घट नोंदविण्यात आली आहे. धुळे तालुक्यातील १२३, साक्री ८३, सिंदखेड ११९ आणि शिरपूरमधील १३४ गावांमधील पाणी पातळीत १ मीटरहून अधिक घट नोंदविण्यात आली आहे. पाठोपाठ औरंगाबादमधील गंगापूर तालुक्यातील ९९ आणि कन्नड तालुक्यातील ९२ गावांतील पाणी पातळीत घट झाली आहे. (प्रतिनिधी)
यंदा ६०० गावांत तीव्र टंचाई
By admin | Published: March 29, 2017 3:33 AM