लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात १ ते ७ जुलैपर्यंत वृक्ष लागवडीचे अभियान राबविण्यात येणार असून चालू वर्षात चार कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. येत्या तीन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक संजीव गौड यांनी पत्रकार परिषदेत दिली. विभागीय आयुक्त अनुप कुमार या वेळी उपस्थित होते. राज्यातील वनाच्छादनाचे प्रमाण सध्या १६ टक्के इतके आहे. वस्तुत: ३३ टक्के वृक्षाच्छादनाचे राष्ट्रीय उद्दिष्ट गाठण्यासाठी जवळपास ४०० कोटी वृक्ष लावावे लागतील. ३३ टक्के वृक्षाच्छादनाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सुरुवात म्हणून २०१६मध्ये १ जुलै रोजी २ कोटी ८३ लाख वृक्ष राज्यभरात लावण्यात आले. पुढील तीन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. या वर्षी ४ कोटी वृक्ष लागवड करण्याचे लक्ष्य आहे. २०१८मध्ये १३ कोटी तर २०१९मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यंदा नागपूर विभागात ८५ लाख ७० हजार वृक्ष लागवड करण्याचे लक्ष्य असून, ही मोहीम पारदर्शीपणे राबविण्यासाठी रोपवन स्थळ, रोपवाटिका स्थळ तसेच लावण्यात येणाऱ्या रोपांची स्थिती आॅनलाइन पद्धतीने संनियंत्रित केली जात असल्याचेही संजीव गौड यांनी स्पष्ट केले.
राज्यात यंदा चार कोटी झाडे लावणार
By admin | Published: May 24, 2017 2:36 AM