पुणे : गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील फळबाजारात जानेवारी महिन्यातच ६० पेटी रत्नागिरी हापूस दाखल झाला आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच चालू हंगामातील आंब्याची आवक सुरळीतपणे सुरू होईल, असा अंदाज फळबाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून सामान्यांना सहजपणे चाखता न येणारा आंबा यंदा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याची शक्यताही व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.रत्नागिरी येथील पावस गावातील शेतकऱ्यांच्या ६० आंब्याच्या पेट्या फळबाजारातील व्यापारी शिवलाल भोसले यांच्याकडे रविवारी दाखल झाल्या. गेल्या २० दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात आंब्याच्या पेट्या पुण्यात दाखल होत आहेत. परंतु, जानेवारी महिन्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंबा दाखल झाला आहे. याबाबत शिवलाल भोसले म्हणाले, की यंदा आंब्याला पोषक असणारे वातावरण आहे. अवकाळी पाऊस किंवा वादळ वाऱ्यामुळे आंब्याचा मोहर गळून पडलेला नाही. त्यामुळे जानेवारीतच ६० पेटी आंबा बाजारात दाखल झाला. एरवी मार्च-एप्रिल महिन्यात आंब्याची आवक सुरू होते. परंतु, यंदा फेब्रुवारी महिना अखेरपासूनच आवक सुरू होण्याची शक्यता आहे, असे नमूद करून भोसले म्हणाले, की पावस येथील हापूस आंबा मोठ्या आकाराचा आणि दर्जेदार आहे. सध्या चार ते सहा डझनाला २ हजार ५०० ते ४ हजार रुपये भाव मिळत आहे. आंब्याची आवक वाढल्यामुळे पुढील काळात आंब्याचे भाव कमी होतील. परिणामी सर्वसामान्य नागरिकांना आंब्याची चव चाखता येईल. पावस गावातील आंबा उत्पादक शेतकरी भाई शिंदे म्हणाले, की माझ्या फळबागेतील आंबा आज पुण्यात दाखल झाला. फेब्रुवारी महिन्यात आंब्याची आवक सुरळीतणे सुरू होईल, असे काही व्यापाऱ्यांना वाटत असले तरी; झाडांना उशिरा पालवी फुटल्यामुळे यंदाही आंब्याची आवक मार्च महिन्यातच सुरळीतपणे सुरू होईल. काही झाडांना लवकर मोहर आला होता,अशा काही झाडांची फळे तोडून बाजारात आणली जात आहेत.
यंदा आंबा सामान्यांसाठी लवकर ‘गोड’ होणार
By admin | Published: February 01, 2016 12:58 AM