ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 20 - जिल्ह्यातील सव व राजूर या गावात रांजन व माठ तयार करण्याचा पारंपारीक व्यवसाय करण्यात येतो. उन्हाळ्यात याच माठांची बुलडाणा शहरात विक्री केली जाते. मात्र शहरात मध्यप्रदेश, बिहार व गुजरात येथील माठ व्यवसायीकांनी शहरात आपली दुकाने थाटली असल्यामुळे स्थानिक माठ व्यवसायाला धोका निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सतत तापमानात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारात माठांचे आगमन झाले आहे. एक माठ अडीचशे ते पांचशे रुपये किंमतीचा असून, नेहमीच्या ढोबळ दिसणा-या काळ्या व लाल रंगाच्या माठापेक्षा परराज्यातून बाजारात आलेला माठ नळ लावलेले, सुबक व नक्षीकाम केलेले आहे.त्यामुळे हे माठ खरेदी करण्यासाठी नागरिकाची गर्दी केली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने माठ तयार करण्यासाठी स्थानिक कुंभार बांधवांना मोठी मेहनत घ्यावी लागते. साधारणत: डिसेंबर, जानेवारी महिन्यात माठ तयार करण्याची प्रक्रिया केली जाते. तर मार्च, एप्रिल व मे या तीनच महिन्यांत जिल्ह्यातील विविध शहरात माठाची विक्री केली जाते. मात्र यंदा हंगाम सुरु होण्याआधीच फेब्रुवारी महीन्यात मध्यप्रदेश, बिहार
व गुजरात राज्यातून आलेल्या व्यवसायीकांनी शहरात स्टेटबॅक चौक, मलकापूर रोड, चिखली रोड आदी वर्दळीच्या ठिकाणी आपली दुकाने थाटली आहे. परराज्यातील माठ व्यवसायीकांच्या या धुसखोरीमुळे स्थानिक माठ व्यवसायीकांच्या व्यवसायावर नक्कीच प्रतिकूल परिणाम होणार आहे.(प्रतिनिधी)