देहूरोड : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्व माध्यमांची प्राथमिक, माध्यमिक विद्यालये १५ जूनपासून सुरू होत आहेत. पाठ्यपुस्तके सर्व मुख्याध्यापक व प्रभारींकडे पोहोचविण्यात आली असून, शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना वाटप करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा, माध्यमिक विद्यालय व बालवाडीतील विद्यार्थ्यांसाठी गणवेश, बूट व मोजेपुरवठा करण्यासाठी बोर्डाने शुक्रवारपासून निविदा प्रक्रियाही सुरू केली असून, ५ जुलैला निविदा उघडण्यात येणार असल्याने गणवेश या वर्षीही उशिरा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्वशिक्षा अभियान मोहिमेंतर्गत पहिली ते आठवीत शिकणाऱ्या सर्व मुली, पहिली ते आठवीपर्यंत शिकणारे अनुसूचित जाती व जमातीतील सर्व मुले यांना दर वर्षीप्रमाणे दोन गणवेश देण्यासाठी बोर्डाच्या संबंधित शाळांकडे निधी येत असतो. बोर्डाच्या शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्याच्या उद्देशाने कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन दर वर्षी स्वत:च्या निधीतून उर्वरित खर्च करून बोर्डाच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या सर्वच घटकांतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश देण्यात येत असतात. या वर्षीही बोर्डाच्या सर्व प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय व बालवाडीतील सुमारे दीड हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश देण्यात येणार आहेत. शाळा सुरू झाल्या नसल्याने विद्यार्थ्यांचा निश्चित आकडा उपलब्ध झालेला नाही. त्याकरिता प्रशासनाकडून आवश्यक खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे. बोर्डाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना बूट व मोजेवाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना दोन तयार गणवेश, बूट व मौजे पुरवठा करण्यासाठी बोर्डाच्या भांडार विभागाच्या वतीने ई-निविदा प्रक्रिया आठ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. ३० जूनअखेर निविदा सूचना मागविण्यात आली असून, ५ जुलैला निविदा उघडण्यात येणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या बोर्डाच्या बैठकीत निविदांना मंजुरी मिळाल्यानंतर कामाचे आदेश देण्यात येणार असून, त्यानंतर गणवेश उपलब्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. एकंदरीत विद्यार्थ्यांना येत्या जुलैअखेर गणवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट होत असून, निविदाप्रक्रिया सुरू होण्यास प्रशासनच जबाबदार असल्याचे मत काही सदस्यांनी व्यक्त केले असून, नाराजी व्यक्त केली आहे. >निविदा प्रक्रियेस विलंब : अधिकाऱ्यांचे दुर्लक्षगेल्या वर्षी निविदा प्रक्रियेस उशीर, तसेच शाळा सुरू झाल्यानंतर प्रवेशप्रकिया पूर्ण होऊन विद्यार्थिसंख्या मिळण्यास व मापे घेऊन गणवेश शिलाई कामात वेळ गेल्याने गणवेशवाटप करण्यास उशीर झाला होता. त्यामुळे या वर्षी निविदाप्रक्रिया लवकर सुरू करून विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश देण्याचे नियोजन करण्याबाबत वेळोवेळी सांगूनही संबंधित विभाग व वरिष्ठ अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याने गणवेश, बूट व मौजे मिळण्यास उशीर होणार आहे, हे वास्तव आहे. -विशाल खंडेलवाल, अध्यक्ष, शिक्षण समिती, देहूरोड कॅन्टोन्मेंट
या वर्षीही गणवेश उशिराच
By admin | Published: June 13, 2016 2:12 AM