ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 6 - राज्यात मान्सूनच्या आगमनाची वाट पहात असतानाच देशवासीयांसाठी राष्ट्रीय हवामान विभागाने मंगळवारी एक खुशखबर दिली असून यंदा होणारा मॉन्सून हा सरासरीच्या ९८ टक्के होणार असल्याची घोषणा केली आहे़ हवामान विभागाने १८ एप्रिल रोजी संपूर्ण चार महिन्याचा प्राथमिक अंदाजानुसारे यंदा मॉन्सून ९६ टक्के होणार असल्याचे जाहीर केले होते़.
जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सुधारित अंदाज हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केला असून तो सर्वसाधारण आहे़ उत्तर पश्चिम भारतात ९६ टक्के मॉन्सून बरसणार असून मध्य भारतात त्याचे प्रमाण १०० टक्के असेल़ दक्षिण भारतात राज्यात ९९ टक्के असून उत्तर -पूर्व भारतात ९६ टक्के पाऊस पडणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे़ या मॉडेलनुसार त्यात ८ टक्क्यांपर्यंत कमीजास्त होण्याची शक्यता आहे़ याशिवाय संपूर्ण देशभरात जुलै महिन्यात ९६ टक्के आणि आॅगस्टमध्ये ९९ टक्के पाऊस पडणार आहे.
सीईएफएस या मॉडेलचा आधार घेऊन संपूर्ण देशासाठीचा हा सुधारित अंदाज जाहीर करण्यात आला असून त्यात प्रामुख्याने ६ घटकांचा समावेश आहे़ पॉसिफिक आणि भारतीय समुद्राच्या पाण्याचे तापमानाचा परिणाम एलनिनोवर होत असतो़ एल निनोचा परिणाम मॉन्सूनवर गेल्या सहा -सात वर्षांपासून होत असल्याचे दिसून आले आहे़ मात्र, या वर्षाच्या दुस-या टप्प्यात एलनिनो कमकुवत असल्याने त्याचा परिणाम होणार नाही़.
मान्सून मिशन कप्लड फोरकास्टिंग सिस्टीमनुसार यंदा संपूर्ण देशात १०० टक्के पाऊस होण्याची शक्यता असून त्यात ५ टक्क्यांपर्यंत फरक पडू शकतो़.
या मॉडेलच्या ५ घटकांनुसार यंदा कमी म्हणजे ९० टक्के कमी पाऊस पडण्याची शक्यता केवळ ७ टक्के असून सर्वसाधारणपेक्षा कमी म्हणजे ९० ते ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता २८ टक्के आहे़ सर्वसाधारण म्हणजे ९६ ते १०४ टक्के पाऊस पडण्याची शक्यता सर्वात जास्त ५० टक्के आहे़ सर्वसाधारणपेक्षा जास्त म्हणजे १०४ ते ११० टक्के पावसाची शक्यता १३ टक्के आणि सर्वात जास्त म्हणजे ११० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची शक्यता केवळ २ टक्के आहे़.
* सर्वसाधारण ९८ टक्के पाऊस बरसणार, त्यात ४ टक्के कमी जास्त
* उत्तर -पश्चिम भारत ९६ टक्के
* मध्य भारत ९९ टक्के
* दक्षिण द्वीवकल्प ९९ टक्के
* उत्तर -पूर्व भारत ९६ टक्के
* जुलै महिन्यात ९६ टक्के
* आॅगस्ट महिन्यात ९९ टक्के पाऊस पडणार