शिवानंद फुलारी लाेकमत न्यूज नेटवर्कअक्कलकोट : यंदाच्या महापुरात शेती, पशुधन, अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य सर्वकाही पाण्यात वाहून गेले. केवळ माणसं जिवंत राहिली. त्यामुळे यंदाची दिवाळी पुनर्वसन करण्यातच जात असल्याची व्यथा संगोगी (ब.) येथील पूरग्रस्त शेतकरी भवनराय बिराजदार हे सांगत होते.
अतिवृष्टीने तालुक्यातील बोरी, हरणा, भीमा, सीना या चारही नद्यांना महापूर आला होता. यामुळे नदीकाठच्या शेतातील सर्वच पिकांबरोबर शेतातील वस्ती, त्यातील सर्व अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य, पशुधन सुद्धा वाहून गेले. केवळ माणसं जिवंत राहिली आहेत. जगण्यासाठी काहीच शिल्लक नाही. आता नव्याने संसार थाटण्याचे काम सुरू आहे.
भवनराय बिराजदार यांच्या शेताजवळील नदीकाठचा पाटबंधारा वाहून गेला. मध्यरात्री अचानकपणे वस्तीला पाण्याने वेढा दिल्याने धान्य, संसारोपयाेगी साहित्य पाण्यात वाहून गेले. जीवनासाठी मुख्य आधार असलेल्या ४ एकर क्षेत्रातील उभी पिके आणि पशुधनसुद्धा शिल्लक राहिले नाही. महापुराच्या तडाख्याने आमचा संसार रात्रीत होत्याचं नव्हतं झालं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे यंदा कसली दिवाळी आणि कसला फराळ काहीच केले नाही. हातउसने काढून पुनर्वसन करण्याच्या कामात कुटुंब गुंतले आहे.
संसारच उरला नाही तर सण कसा साजरा करणारयंदाच्या महापुरानं जीवनभर कष्टानं उभा केलेला संसार वाहून गेला. त्यामध्ये पाच पोती ज्वारी, सहा पोती गहू, तांदूळ, डाळ यासह कपडे, अंथरुण-पांघरुण हे सर्व वाहून गेले. घरात काहीच शिल्लक राहिलं नाही. आता शेतीचं आणि संसाराचं पुनर्वसन करणं अवघड आहे. त्यामुळे यंदा जिथं संसारच नाही तिथं सण कसा साजरा करणार, असा सवाल उपस्थित करीत दिवाळीला फराळाचं काहीच केलं नाही. शिवाय काही करण्याची इच्छाही नाही, असं शरणव्वाबाई बिराजदार यांनी सांगितलं.