हितेन नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर: माझे आणि उपमुख्यमंत्र्यांचे बाँडिंग मजबूत आहे. ‘यह फेविकॉल का जोड़ है, टूटेगा नहीं,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्याचवेळी, माझी अन् मुख्यमंत्र्यांची मैत्री घट्ट आहे. ही मैत्री अन् युती काल होती, आज आहे आणि उद्याही राहील, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘हम साथ-साथ है’चा विश्वास दिला. पालघरच्या सभेत एकाच व्यासपीठावरून या दोघांनी युतीचा आवाज बुलंद करत जाहिरातीच्या वादावर पडदा टाकला.
शिवसेनेच्या जाहिरातीवरून युतीमध्ये उद्भवलेल्या वादानंतर शिंदे-फडणवीस काय बोलतात, याची प्रचंड उत्सुकता होती. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या जिल्ह्यातील शुभारंभानिमित्त कोळगावच्या सिडको मैदानावर आयोजित या सभेत दोघांनी एकमेकांची भरपूर प्रशंसा केली. एकमेकांचा उल्लेख ‘लोकप्रिय’ असा केला. व्यासपीठावर बसले असताना कानगोष्टीही केल्या.
या सभेला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खा. राजेंद्र गावित, आ. हितेंद्र ठाकूर, श्रीनिवास वनगा, क्षितिज ठाकूर आणि निरंजन डावखरे, श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील उपस्थित होते. कपिल पाटील व रवींद्र चव्हाण यांचीही यावेळी भाषणे झाली.
आमची धरम-वीरची जोडी : मुख्यमंत्री
आमची युती वैचारिक आहे. खुर्चीसाठी नाही. फडणवीस आणि माझी दोस्ती २० वर्षांपासूनची अन् जिवाभावाची आहे. कोणी म्हणते आमची जय-वीरूची जोडी आहे, धरम-वीरची जोडी आहे. कोणी कितीही प्रयत्न केला तरी ‘यह फेविकॉल का जोड़ है, टूटेगा नहीं’ असे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाहत म्हणाले. आमचे सरकार सामान्यांसाठी काम करते, खुर्चीसाठी नाही. विरोधकांना मात्र पोटदुखी होते, असा टोला त्यांनी हाणला.
उद्याही आम्ही सोबत राहू : फडणवीस
आज आम्ही हेलिकॉप्टरमधून एकत्र आलो. आमचा २५ वर्षांचा एकत्र प्रवास आहे. काल, आज आणि उद्याही सोबत राहू. सामान्यांचे जीवन बदलण्यासाठी सत्तेत आलो. खुर्ची तोडण्यासाठी नाही. एखाद्या जाहिरातीमुळे सरकारला काही होईल इतके ते तकलादू नाही. आधी कोणाचे भाषण यावरून एकमेकांची गच्ची पकडणारे हे पूर्वीसारखे सरकार नाही. पूर्वीचे सरकार घरीच असायचे. आताचे सरकार जनतेच्या दारी आहे.
शिंदे पिता-पुत्र अन् फडणवीस यांच्यात चर्चा
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि खा. श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी अर्धा तास बंदद्वार चर्चा केली. जाहिरातीच्या वादानंतर यापुढे असे कोणतेही वादाचे विषय उद्भवू नयेत यासाठी ही चर्चा झाल्याचे कळते. कल्याण-डोंबिवलीत युतीचा धर्म पाळावा, असे श्रीकांत शिंदे यांना सांगण्यात आले. मंत्री व भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्याशी शिंदे-फडणवीस यांनी दुपारीच यावर चर्चा केली होती, असे समजते.