"ये तो ट्रेलर है... पिक्चर अभी..."! CM शिंदेंचा सूचक इशारा, तर सिनियर असूनही मागे राहिल्याची अजित दादांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 08:11 AM2024-08-08T08:11:57+5:302024-08-08T08:12:46+5:30

...याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण १९९० च्या बॅचचे असूनही राजकारणात शिंदे-फडणवीसांच्या मागे राहिलो, अशी खंत व्यक्त केली. 

Yeh to trailer hai picture abhi baki saya CM Shinde while Ajit Dada regrets being left behind despite being a senior. | "ये तो ट्रेलर है... पिक्चर अभी..."! CM शिंदेंचा सूचक इशारा, तर सिनियर असूनही मागे राहिल्याची अजित दादांची खंत

"ये तो ट्रेलर है... पिक्चर अभी..."! CM शिंदेंचा सूचक इशारा, तर सिनियर असूनही मागे राहिल्याची अजित दादांची खंत

ठाणे : ज्या व्यक्तीचे योगदान देऊन झाले आहे त्याचे जीवन चरित्र प्रकाशित होते. परंतु, माझ्यावरील हे पुस्तक म्हणजे माझ्या राजकीय जीवनाचा क्लायमॅक्स नाही. इंटरव्हलही नाही. हे पुस्तक ये तो ट्रेलर है. पिक्चर अभी बाकी है, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपणच यापुढेही मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असल्याचे अप्रत्यक्षपणे बुधवारी सूचित केले. याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण १९९० च्या बॅचचे असूनही राजकारणात शिंदे-फडणवीसांच्या मागे राहिलो, अशी खंत व्यक्त केली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावरील प्रा. प्रदीप ढवळ लिखित ‘योद्धा कर्मयोगी’ या ग्रंथाचे बुधवारी गडकरी रंगायतन नाट्यगृहात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी स्वत: शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक आदी मान्यवर उपस्थित होते.  वारकरी संप्रदायाची थीम यावेळी स्वीकारली होती व दिंडीच्या स्वरूपात शिंदे यांच्यावरील ग्रंथ कार्यक्रमस्थळी दाखल झाला. सर्व मान्यवरांनी वारकऱ्यांप्रमाणे फेटा परिधान केला होता. वारकरी संप्रदायाचे पद्मश्री शंकरबाबा पापळकर हेही उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस १९९९ साली आमदार झाले. एकनाथ शिंदे २००४ साली आमदार झाले. विधानसभेत मी या दोघांना सिनियर आहे. मी १९९० च्या बॅचचा आमदार आहे. परंतु, हे सगळे माझ्या पुढे गेले आणि मी मागे राहिलो. ज्या त्या गोष्टी त्या-त्या वेळी घडतात. एकनाथ शिंदे एवढे आमदार घेऊन आले; पण मला मुख्यमंत्रिपद देणार हे सांगितले असते तर मी अख्खा पक्षच घेऊन आलो असतो. जे नशिबात असते तेच घडते. शिंदे हे जास्तीतजास्त लोकांच्या पत्रांवर सह्या करणारे मुख्यमंत्री आहेत, असा चिमटा त्यांनी काढला. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजित पवार हे अर्थमंत्री आहेत. त्यामुळे फाईलवर ते असे काही लिहितात की, फाईल फिरून त्यांच्यापर्यंतच आली पाहिजे. मी एकाच टर्ममध्ये मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता व मुख्यमंत्री झालो. अजित पवार तुम्ही एकाच टर्ममध्ये उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता व पुन्हा उपमुख्यमंत्री झालात. पण, शिंदे यांचा रेकॉर्ड तुटणे शक्य नाही. सत्ताधारी पक्षातून बाहेर पडून त्यांनी विरोधी पक्षासोबत सत्ता स्थापन करण्याची हिंमत दाखवली. त्यामुळे ते पुस्तकाचे नायक बनले, अशा शब्दांत फडणवीस यांनी पवार यांना चिमटा काढला. 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी मुख्यमंत्री असलो तरी आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो व करत राहणार. मुख्यमंत्री हा माझ्याकरिता कॉमन मॅन आहे. मी व देवेंद्र फडणवीस आम्ही रात्री उशिरापर्यंत काम करतो आणि अजित पवार पहाटेपासून काम सुरू करतात. असे हे आमचे तिघांचे ट्वेन्टी फोर बाय सेव्हन काम करणारे सरकार आहे.

अमिताभ व शिंदे यांच्यात साम्य
अमिताभ बच्चन व एकनाथ शिंदे यांच्यात साम्य असल्याचे मत राज्यपाल राधाकृष्णन यांनी व्यक्त केले. बच्चन व शिंदे हे त्यांच्या कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात फारसे कुणाला माहीत नव्हते. दुसऱ्या टप्प्यात शिंदे यांनीही बच्चन यांच्याप्रमाणेच जंजीर तोडून दिवार ओलांडली व शोलेचे दर्शन घडवले, असे उद्गार राधाकृष्णन यांनी काढले.
 

 

Web Title: Yeh to trailer hai picture abhi baki saya CM Shinde while Ajit Dada regrets being left behind despite being a senior.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.