मुक्ता सरदेशमुख
राज्यात यंदा पावसाने काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी दडी मारल्याचे चित्र असताना भारतीय हवामान खात्याने कोकणासह विदर्भ आणि मराठवाड्याला जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. हे वृत्त प्रसिद्ध होत असताना नाशिक शहर आणि परिसरात जोरदार पावसाचे आगमन झाले. संभाजीनगर परिसरातही आज पावसाने हजेरी लावली.
दरम्यान लांबलेल्या खरिपाच्या पेरण्यांमुळे काळजीत पडलेल्या बळीराजाला 'पेरते व्हा' चा संदेश छत्रपती संभाजीनगरच्या कृषी हवामान केंद्राने दिला आहे. तसेच येत्या १५ जुलै पर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून बहुतेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
यलो अलर्ट कुठे?सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना. बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, वर्धा, नागपूर, यवतमाळ जिल्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरधारांचा इशारा देण्यात आला आहे.
मुसळधारांचा अंदाज
गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रातून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहणार असून १३ ते १६ जुलै दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या ते माध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच आज (१२ जुलै) रोजी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
खरिपाच्या पेरण्यांसाठी पोषक स्थिती
यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या. पेरण्यांसंदर्भात बळीराजाच्या संभ्रम वाढलेला दिसत असताना पेरणीयोग्य पाऊस झाला असेल तर पेरणी करण्यास हरकत नाही असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. छत्रपती संभाजीनगर कृषी हवामान केंद्राने दिलेल्या सल्ल्यानुसार, "सोयाबीन, ज्वारी, बाजरी व इतर पीक उत्पादक शेतकऱ्यांनी आपापल्या विभागात पेरणीयोग्य पाऊस (७५ ते १०० मि.मि.) झाला असेल तर पेरण्या करता येतील . तसेच शेतकऱ्यांना पिकांची पेरणी बीज प्रक्रिया पूर्ण करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे."
शिव काजळे, केव्हीके, छत्रपती संभाजीनगर
कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?
हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पालघर, नाशिक, नंदूरबार, धुळे, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, हिंगोली, नांदेड, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांमुळे होणारा धोका टाळण्यासाठी पुरेशी काळजी घेण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाची उघडीप पाहायला मिळाली असली तरी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि खान्देशात हलक्या ते माध्यम सारी बरसतील. कोकणातील सिंधुदुर्ग तर विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ अकोला, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया , गडचिरोली जिल्ह्यात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.