लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टीलगत द्रोणीय पट्टा कायम असल्याने राज्यात सर्वदूर पाऊस होत आहे. त्यामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट दिला असून, गडचिरोली, गोंदिया येथे रेड अलर्ट दिला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गेल्या २४ तासांत कोकणातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. फोंडा १८६, माथेरान ११६, दोडामार्ग ९४, दाबोलीम ८७, कर्जत ८० मिमी पावसाची नोंद झाली असून, अन्यत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात इगतपुरी १२८, लोणावळा ११६, महाबळेश्वर १०७, आजरा ९८, राधानगरी ८५, गगनबावडा ६६, शाहूवाडी ५२, वेल्हे ४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा व विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. घाटमाथ्यावरील शिरगाव १६८, कोयना १६२, दावडी १३८, अम्बोणे ११२ मिमी पावसाची नोंद झाली असून, इतरत्रही चांगला पाऊस झाला आहे.
गुजरात ते महाराष्ट्र किनारपट्टीलगत निर्माण झालेली द्रोणीय स्थिती अद्याप कायम आहे. त्यामुळे कोकणातील बहुतांश ठिकाणी सोमवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक परिसरातील घाट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, सोसाट्याचा वारा व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भात गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. अन्य जिल्ह्यांत मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
गडचिराेली जिल्ह्यात पुन्हा पूरपरिस्थिती
गाेदावरी नदी धाेक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. त्यामुळे सिराेंचा तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, तसेच पर्लकाेटा नदीचे पाणी भामरागड तालुकास्थळी शिरल्याने तालुक्यातील शेकडाे गावांचा संपर्क तुटला आहे. मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस काेसळत आहे. जिल्ह्यातील सर्वच नदी, नाले ओसंडून वाहत असले, तरी पुराचा माेठा फटका सिराेंचा व भामरागड तालुक्याला बसला आहे. सिराेंचा तालुक्यातील गाेदावरी नदीला पूर आल्याने २३१ कुटुंबांतील ७७५ नागरिकांना चार दिवसांपूर्वीच सुरक्षितस्थळी हलविले आहे. भामरागड तालुका व छत्तीसगड राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पर्लकाेटा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे.