राज्यात ‘येरवडा’ पॅटर्न! सीआयडीसाठी राष्ट्रवादी सहमत नाही, तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा निरोप; मीरा बोरवणकरांचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 06:50 AM2023-10-17T06:50:11+5:302023-10-17T06:51:08+5:30

येरवड्यातील जमीन ज्या बिल्डरला ‘प्रक्रिये’नुसार देण्यात आली होती. त्याच्या आजूबाजूचे दोन्ही भूखंड संबंधित बिल्डरचेच होते, असा दावा त्यांनी केला.

'Yerwada' pattern in the state! Builders, Leaders, Bureaucrats and Police: Meera Borwankar allegation on ex CM, NCP about CID post | राज्यात ‘येरवडा’ पॅटर्न! सीआयडीसाठी राष्ट्रवादी सहमत नाही, तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा निरोप; मीरा बोरवणकरांचे गंभीर आरोप

राज्यात ‘येरवडा’ पॅटर्न! सीआयडीसाठी राष्ट्रवादी सहमत नाही, तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा निरोप; मीरा बोरवणकरांचे गंभीर आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : महाराष्ट्रात शासनाच्या भूखंडांवर नजर असलेल्या बिल्डर्सचे राजकीय नेते, नोकरशहा आणि पोलिसांशी भयंकर लागेबांधे असून पुण्यातील येरवडा पोलिस ठाण्याच्या जमिनीचा लिलाव हे एकमेव उदाहरण नाही, असा आरोप सोमवारी माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी येथे केला.

येरवड्यातील जमीन ज्या बिल्डरला ‘प्रक्रिये’नुसार देण्यात आली होती. त्याच्या आजूबाजूचे दोन्ही भूखंड संबंधित बिल्डरचेच होते, असा दावा त्यांनी केला. राज्यात अनेक ठिकाणी ‘येरवडा’ पॅटर्नने सरकारी भूखंड हडपण्याचे प्रकार सुरू आहेत. 
पुस्तकातील खुलाशानंतर अनेक अधिकारी, माजी न्यायमूर्तींचे मोठ्या प्रमाणावर फोन येत आहेत. कोर्टामुळे औरंगाबादमधील ५० एकरचा भूखंड बिल्डरच्या घशात जाण्यापासून वाचला, असे त्या म्हणाल्या.

इतर ठिकाणची जमीनही हडपली?
पुण्यातील वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूटची जागा एका बिल्डरला हस्तांतरित करण्यासाठी २०१३ ते २०१६ या काळात आपल्यावर केंद्रीय संस्थांचा दबाव आणला होता, असा संदेश एका अधिकाऱ्याने पाठविला. 
आता पुण्यातील राज्य राखीव पोलिस दलाची (एसआरपीएफ) पण जमीन गेली आहे, त्याबद्दलही बोला, असा एका अधिकाऱ्याचा फोन आपल्याला आला, असे मीरा बोरवणकर म्हणाल्या.

आपला राजकारणाशी संबंध नाही. त्यामुळे या खुलाशामुळे पुढे काय होईल हे सांगू शकत नाही. जिथे जिथे खासगी बिल्डर्सना सरकारी जमिनी दिल्या आहेत, त्यांचा फेरआढावा घेण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.

सीआयडीचे पद मिळाले नाही
येरवडा पोलिस ठाण्याची जमीन देण्यास ठाम नकार देण्याचा परिणाम आपल्याला पुढच्या नियुक्तीवर झाला. पुण्यात अपर महासंचालक सीआयडीचे पद रिक्त असतानाही आपल्याला ते नाकारण्यात आले. सीआयडीमध्ये बिल्डरांशी संबंधित अनेक प्रकरणांची चौकशी प्रलंबित होती. या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सहमत नसून आघाडीचा धर्म पाळावा लागेल, असे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी  सांगितले, पण पुण्यातच नियुक्ती हवी असल्यामुळे कारागृह विभागातील नियुक्ती स्वीकारली, असे बोरवणकर म्हणाल्या.

‘मॅडम, आपण यात पडू नका’
आपण तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेतली. तेव्हा ‘मॅडम आपण यात पडू नका,’ असे त्यांनी आपल्याला बजावले होते. ज्यांच्या कार्यकाळात जमिनीच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली होती ते आपल्या आधीचे पोलिस आयुक्तही खुश नव्हते. 

अब्रूनुकसानीचा दावा त्यांची इच्छा
‘दादा’ अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचे निदर्शनास आणले असता, ‘त्यांची इच्छा’ अशी प्रतिक्रिया बोरवणकर यांनी दिली.

Web Title: 'Yerwada' pattern in the state! Builders, Leaders, Bureaucrats and Police: Meera Borwankar allegation on ex CM, NCP about CID post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.