औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने बॅचलर आॅफ आॅफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (बीसीए) अभ्यासक्रमाला नापास असलेल्या विद्यार्थ्यांच्या पदव्यांची छपाई झाली. या पदव्या महाविद्यालयांमध्ये पोहचल्या, त्यातीला दोन पदव्यांचे वाटपही विद्यार्थ्यांना झाले. मात्र या दोन्ही पदव्या विद्यार्थ्यांकडून परत घेतल्या असून, इतर महाविद्यालयात असलेल्या नापासांच्या पदव्या जप्त केल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कबुलीमुळे ‘लोकमत’च्या १४ जुलै रोजीच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले.
‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या नापास विद्यार्थ्यांच्या पदव्या वाटप प्रकरणावर कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, या घटनेविषयी माहिती नव्हती, ‘लोकमत’कडून माहिती कळाल्यानंतर पाच मिनिटांमध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली. यानंतर बीसीए अभ्यासक्रमाच्या पदव्यांमध्येच ही गडबड झाल्याचे समोर आले. इतर अभ्यासक्रमांमध्ये गडबड झालेली नाही. अधिकारी कर्मचाºयांनी एका दिवसात ज्या महाविद्यालयात अशा सदोष पदव्या पाठविलेल्या आहेत. त्याठिकाणाहून त्या जमा केल्या असून, आता कोणतेही महाविद्यालय, विद्यार्थ्यांकडे सदोष पदवी प्रमाणपत्र नाही. महाविद्यालयांना पदवी प्रमाणपत्रांचे विरतण करताना तपासून करण्याचे आदेश दिलेले आहे. तसेच विद्यापीठ अध्यादेश १०१ नुसार कोणतेही सदोष प्रमाणपत्र दुरुस्त करण्याचा करण्याचा, त्यात बदल करण्याचा अधिकार विद्यापीठाला आहे. यामुळे जर चुकून कोणत्या विद्यार्थ्यांला सदोष पदवी प्रमाणपत्र गेल्याचे यापुढेही लक्षात आलेच तर ते रद्द करण्यात येईल, असेही डॉ. चोपडे यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, कुलसचिव डॉ. साधना पांडे, परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके, अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. संजय साळुंके, डॉ. मुळे उपस्थित होते.
उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली. या समितीच्या सदस्यपदी राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे आणि अधिष्ठाता डॉ. मजहर फारुकी यांचीही नेमणूक केली. ही समिती दोन दिवसात अहवाल सादर करणार असून, त्यानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी सांगितले.
सहा जणांना कारणेदाखवा नोटीस
या प्रकरणात परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके, उपकुलसचिव हेमलता ठाकरे, कक्षअधिकारी पोपट निकम, भगवान फड, वरिष्ठ सहायक राजू गायकवाड आणि विनोद जाधव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी सांगितले.
चुकीची नैतिक जबाबदारी स्विकारुन माफी मागतो
विद्यापीठ प्रशासनाने पहिल्यादांच पदवी प्रमाणपत्राच्या छपाईचे आऊटसोर्सिंग करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश परीक्षा विभागाला ६ मे रोजी मिळाले. दीक्षांत सोहळा १५ मे रोजी होता. संबंधित कंपनीला पदव्या छापण्याची दिलेली वर्कआॅर्डर आणि दीक्षांत सोहळ्यात आवघा सात दिवसांचा कालावधी होता. या कमी कालावधीमुळे कंपनीकडे पाठविलेल्या २६४ अभ्यासक्रमांपैकी एका बीसीए अभ्यासक्रमाच्या डाटात तांत्रिक चुक झाली. तरीही यामुळे विद्यापीठाची जी बदनामी झाली, त्याची नैतिक जबाबदारी स्विकारून मराठवाड्यातील जनतेची माफी मागतो.
- डॉ. दिगंबर नेटके, परीक्षा संचालक